Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वारकरी भवनाचे सोमवारी लोकार्पण

Share

सिन्नर । प्रतिनिधी

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून विजयनगरमधील एम. जी. नगरच्या मोकळ्या भूखंडावर ५६ लाख रुपये खर्चुन बांधलेल्या पूण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर भवनाचा लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी (दि.२२ ) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यानिमित्त आठ दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच भवनाजवळ विठ्ठल- रखूबाई मंदिर बांधण्यात येणार असून, या मंदिराचा भूमीपूजन सोहळा यावेळी पार पडणार आहेे.

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील एमजीनगरमधील नगरपरिषदेच्या मालकीच्या २५ गुंठे भूखंडावर वारकरी भवन बांधण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे, आ. रामहरी रुपनवर यांनी प्रत्येकी दहा लाखांचा निधी दिला आहे. यातून अद्ययावत असे वारकरी भवन उभे राहीले आहे. नगर परिषदेने मोकळ्या भूखंडाच्या संरक्षक भिंतीसह परिसराच्या सुशोभीकरणाचे काम केले आहे. या भवनाचे ‘पूण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन’असे नामकरण करण्यात आले आहे.

ना. डॉ. गोर्‍हे, आ. रुपनवर यांच्यासह रामराव महाराज ढोक, आ. वाजे यांच्या उपस्थितीत भवनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्याबरोबरच आयोजीत कीर्तन महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी आ. वाजे यांच्या संपर्क कार्यालयात काल (दि.१८) तालुक्यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार व गुणीजन यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अशोक महाराज घुमरे अध्यक्षस्थानी होते. सोमवार (दि.२२) पासून २९ जुलैपर्यंत होणार्‍या कीर्तन महोत्सवात दररोज सायंकाळी ५ वाजता हरीपाठ व सायंकाळी ७ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रामराव महाराज ढोक हे महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. त्यानंतरचे सात दिवस राज्यातील वारकरी विद्वतजन कीर्तने करणार आहेत.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी किशोर महाराज खरात यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक गावातील वादक, गायक, भजनी मंडळाचे गुणीजन या महोत्सवास उपस्थित रहावेत यासाठी जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले. गावा-गावात होर्डींग्ज लावणे, पत्रके पोहोचवणे यासह नियोजनाबाबत विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर वारकरी भवनाच्या परिसराला सर्वांनी भेट देऊन सुरु असलेल्या सभा मंडपाच्या कामाची पाहणी केली. त्याबाबत संबंधितांना विविध सुचना केल्या.

यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, उदय सांगळे, कृष्णाजी भगत, पांडुरंग महाराज गिरी (वावीकर), सुदाम महाराज काळे, अशोक महाराज घुमरे, किशोर महाराज खरात, ज्ञानेश्‍वर महाराज तुपे, राहुल महाराज डुंबरे, बाळासाहेब महाराज कांदळकर, कैलास महाराज तांबे, रविंद्र महाराज नन्नवरे, रवी महाराज काकड, कृष्णा महाराज गिरी, पंढरीनाथ महाराज सहाणे, राहूल महाराज गायकवाड, नितीन महाराज कोकाटे, कांताराम कुर्‍हाडे, योगेश महाराज आव्हाड यांच्यासह तालुक्यातील कीर्तनकार, गायक, मृदूंग वादक, भजनी मंडळासह गुणीजन उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!