Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सक्तीची कर्जवसुली थांबवावी

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा बँकेने सक्तीची कर्जवसुली व शेतजमिनीचा लिलाव तत्काळ थांबावावा, एच.टी.बी.टी.बियाणांवरील बंदी केंद्र सरकारने उठवावी, सातबारा कोरा करून शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे अशा विविध मागण्या शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात तीव्र स्वरुपाचा दुष्काळ असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. शासनाने तसे परिपत्रकही काढले असून त्यामध्ये शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिलेली असतानादेखील नाशिक जिल्हा बँक शेतजमिनीचे लिलाव बेकायदेशीरपणे करीत आहे. अनेक शेतकर्‍यांना बँकेने शेतजमिनीचे लिलाव नोटिसा पाठवल्या आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी यात स्वतः लक्ष घालून सक्तीची कर्जवसुली व शेतीजमिनीचे लिलाव थांबवावेत. बँका शेतकर्‍यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवून मानसिक त्रास देत आहेत. केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीत चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. केंद्र सरकारने साखर, कांदा आयात करून शेतमालाचे भाव हेतूपुरस्कर पाडले. शेतीमालाच्या निर्यातीला निर्यात शुल्क वाढवून निर्यातबंदी लावली आहे. सरकारच्या अशा व्यवस्थेमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुष्काळ, गारपीट, वादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. तरी यामध्ये आपण लक्ष घालून सक्तीची कर्जवसुली थांबवावी. अगोदर बिगर शेतकरी, मोठे थकबाकीदार, लोकप्रतिनिधी व इतर संस्थांची कर्जवसुली करावी. शेतकर्‍यांकडून सक्तीची कर्जवसुली व शेतजमिनीचे लिलाव थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भगवान बोराडे, अर्जुन बोराडे, रामनाथ ढिकले, मधुकर हांबरे, बाळू पाटील, किरण कहांडळ, रामकृष्ण बोंबले, संध्या पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

त्वरित कार्यवाही करू
निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा बँकेने लिलाव करू नये, असे आदेश काढल्याचे सांगितले. त्यावर शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 30 जुलै रोजी लिलाव काढण्याच्या नोटिसा दाखवल्या. त्यावर जिल्हाधिकारी मांढरे यांनी हे लिलाव थांबवण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!