Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : तिवरे धरणफुटीनंतर जिल्ह्यातील धरण तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती; १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

Share

नाशिक । प्रतिनिधी

कोकणातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना धरणांची सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानूसार जिल्हाधिकारी सूरंज मांढरे यांनी जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके व प्रवीण खेडकर या तीन अधिकार्‍यांची समिती गठित केली आहे.

पुढील 15 दिवसात जिल्ह्यातील लघुसिंचन प्रकल्प, बंधारे व मोठी धरणे यांच्या सुरक्षेचा अहवाल त्यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने 14 जणांना जलसमाधी मिळाली. तर, काही गावे पाण्याखाली गेली होती. या घटनेमुळे राज्यातील धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ऐन पावसाळ्यात मोठी दुर्घटना नको घडायला म्हणून राज्य शासनाने तातडीने पावले उचलत याबाबत राज्यातील जिल्हांधिकार्‍यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील धरणांची सुरक्षेची तपासणी करुन अहवाल सादर करा, असे आदेश देण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी धरण सुरक्षा तपासणीसाठी त्रि सदस्यीय समिती गठित केली आहे. नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

मुंबईसह नगर व मराठवाड्याची तहान नाशिक जिल्हा भागवितो. या ठिकाणी छोटी मोठी 24 धरणे आहेत. त्यातील बहुतांश धरणे हे ब्रिटिश कालीन आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरण सुरक्षा हा मुद्दा महत्वपूर्ण ठरतो. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके यांंच्याकडे लघुसिंचन प्रकल्पाची सुरक्षा तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात साधारणत: 1800 हून अधिक लघुसिंचन प्रकल्प आहेत. तर, प्रवीण खेडकर यांच्याकडे जिल्ह्यातील लघु व मध्यम बंधार्‍यांची तपासणीचे काम देण्यात आले आहे. जलसंपदाचे राजेश मोरे यांच्याकडे मोठ्या धरणाची सुरक्षा तपासणीचे काम देण्यात आले आहे. धरणांची सदयस्थिती, त्यांची सुरक्षा, डागडुजीची आवश्यकता याबाबत सविस्तर अहवाल पुढील 15 दिवसात तयार करुन तो जिल्हाधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे.

धरणांची सुरक्षा तपासणीबाबत त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. लघुसिंचन प्रक्‍लप, लघु व मध्यम बंधारे व मोठी धरणे यांंच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाईल.

– सूरज मांंढरे, जिल्हाधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!