Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकगतवर्षी नायलॉन मांज्यामुळे ६६ पक्ष्यांचा मृत्यू

गतवर्षी नायलॉन मांज्यामुळे ६६ पक्ष्यांचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

पतंगोत्सवासाठी तरुणाईसह लहान मुले काचकुयरी, नायलॉन व चायनीज मांज्यांचा मनसोक्त वापर करतात. अलीकडेच या मांज्याची क्रेझ वाढली असताना, त्याचा वापर पशू-पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत. मांज्यामुळे सन २०१९ मध्ये ६६ पक्ष्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

यात ४ घुबड, ३१ कावळा, १७ कबुतर, ७ घार, ३ साळुंकी, २ करकोचा,२ वटवाघुळ अशा ६६ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बंदी असलेला नायलॉन मांजा वापरला जात असल्याने तो पक्ष्यांसाठी फास ठरत आहे. मागील दोन वर्षांत २०१८ ते २०१९ मध्ये ३१७ विविध प्रजातींच्या पक्ष्यांना या मांजाचा फटका बसला आहे.

मकरसंक्रातची चाहूल लागताच शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर सुरू झाला आहे, पक्षीच नाही तर वाहनधारक, पादचार्‍यावर नायलॉन मांजा जीवावर बेतत असल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने कबुतर, साळुंकी, घार, कारकोचा, कावळा, वटवाघुळ या पक्ष्यांचे जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. संक्रांत सण सुरू होण्याआधी एक महिना व नंतर महिनाभर चालत असल्यामुळे पक्ष्यांना या मांज्यामुळे प्राणास मुकावे लागते.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात पतंगबाजीची हौस तरुणाईकडून केली जाते. शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी नायलॉन मांज्या विक्री करणार्‍यांवर निर्बंध घातले असले तरी तो छुप्या पद्धतीने विकला जातो. मात्र नागरिकांनी पतंगबाजीची हौस करताना आपल्या चुकीमुळे मुक्या पक्ष्यांचा जीव जाणार नाही ना, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

शहरातील विविध भागात नायलॉन मांजात अडकून पडलेल्या पक्ष्यांची अग्निशमन विभागाकडून सुटका केली जाते, जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये तब्बल १६५ पक्षी जायबंदी झाले तर २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १५२ जखमी पक्ष्यांना सोडविण्यात आले, यातील अनेक पक्ष्यांचे पाय, पंख व शरीरातील इतर भागांना जखमा झाल्यात. पतंग कटल्यावर तो कुठेतरी पडून जातो आणि तुटलेला मांजा लटकत राहतो. अशा लटकणार्‍या मांज्यात पक्ष्यांचे पाय किंवा पंख हमखास अडकतात. सुटण्यासाठी धडपड केल्यानंतर पक्षी त्यात अधिकच अडकतो.

चायनीज मांजा हा वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेने बनवलेला मजबूत तंतू असल्यामुळे पक्ष्यांना तो स्वत: तोडता येत नाही. अडकलेला पंख किंवा पाय सोडवता न आल्यामुळे त्यावर अतिरिक्त ताण येऊन तो सुजतो आणि त्या ठिकाणी मांजाने काचून जखम होते. अधिक काळ पक्षी अन्नपाण्याविना जखमी स्थितीत अडकून राहिल्याने तो मृत्युपंथाला लागतो.

ही घ्या खबरदारी
* चायनीज किंवा नायलॉनचा मांजा वापरू नका, प्रसंगी पोलीस कारवाई होऊ शकते.
* हाताने तोडता येईल, असा मांजा वापरा
* पतंग कटल्यावर तुटलेला मांजा नष्ट करा
* नायलॉन मांजाने पतंग उडविली जात असल्यास, संबंधिताला परावृत्त करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या