Type to search

Featured सार्वमत

जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी कक्षा रुंदावणे गरजेचे : गुप्ते

Share

नाशिक | प्रतिनिधी

जागतिक व्यापाराची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. त्यासाठी उद्योगांनी जागतिक बाजारपेठेतील बदलांबाबत अद्ययावत असणे अनिवार्य असून केवळ स्थानिक पातळीवर विचार न करता आपल्या वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन निर्यात तज्ज्ञ विरेंद्र गुप्ते यांनी केले.

निमा व वर्ल्ड ट्रेंड सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस, सातपूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. ग्राहक मग तो स्थानिक असो की, दुसर्‍या देशातील कोणालाही कमी लेखू नये. नवनवीन कौशल्ये आत्मसात करत राहणे, ही काळाची गरज आहे, असे गुप्ते यांनी सांगितले. ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास’ या विषयावर वरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशीकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्र, नाशिकचे सहसंचालक प्रवीण देशमुख, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला, निर्यात तज्ज्ञ विरेंद्र गुप्ते, निमाच्या सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर हे होते.

गौरव धारकर यांनी स्वागत केले. निमाचे उपाध्यक्ष शशीकांत जाधव यांनी निमाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधातील अडचणी व शंका या कार्यशाळांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या माध्यमातून राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन निर्यातीची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या सल्लागार वंदना प्रताप, कृती अग्रवाल यांनी सरकाराच्या मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या विस्तारासाठी कोणती मदत करू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.

निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. कार्यशाळेस कैलास आहेर, जिल्हा उद्योग केंद्र नाशिकचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, उपसंचालक उमेशचंद्र दंडगव्हाळ, व्यवस्थापक अतुल दवंगे, निमा कार्यकारिणी सदस्य उदय रकिबे, कमलेश नारंग, राजेश गडाख, अखिल राठी, नीलिमा पाटील, सागर लोखंडे, हिमांशू कनानी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

देशातील सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांच्या क्षमता मोठ्या आहेत. त्यांना निर्यातक्षम बनवण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. लिन मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन प्रोसेसिंग, संशोधन व विकास (आर अँड डी), उत्पादन व सेवांचा दर्जा उंचावत जागतिक स्तराचा करणे, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण इ. बाबींची कास उद्योजकांनी धरावीे. भारतात वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात चांगला वाव असून येथील वैद्यकीय सुविधा दर्जेदार असून अन्य देशांच्या तुलनेत माफक दरात उपलब्ध आहेत.
– वीरेंद्र गुप्ते ( निर्यात तज्ज्ञ, टाटा उद्योग समूह)

नाशिक विभागात येणार्‍या काळात २० क्लस्टरच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांचे क्लस्टर उभे करण्याचा संकल्प आहे. त्यातील बारा क्लस्टर्सची प्रक्रिया पूर्णत्वाच्या दिशने वाटचाल करीत आहे; तर उर्वरित क्लस्टर निर्मितीचे कामही गतिमान करण्यात आले आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निश्‍चित नवसंजीवनी मिळेल
– प्रवीण देशमुख (सहसंचालक जिल्हा उद्योग केंद्र)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!