Type to search

Featured नाशिक

शेतकर्‍यापर्यंत बँकांनी माहिती पोहचवावी- जिल्हाधिकारी

Share

नाशिक | प्रतिनिधी

शेतकर्‍यांची आर्थिक क्षमता वाढीसाठी सर्व बँकांनी त्यांच्याप्रती कटिबद्ध असणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांची गरज समजवून घेऊन त्यांच्यासाठी असणार्‍या आर्थिक लाभाच्या योजनांची सुयोग्य माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बँकांची असल्याने त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर बी.एस.टाव्हरे, अग्रणी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक बी.व्ही. बर्वे यांचेसह आरबीआयचे एलबीओ प्रवीण शिंदकर यांचेसह सर्व बँकाचे व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले, शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाची साठवणूक व विपणन करण्यासाठी बँकामार्फत आर्थिक सहाय्य देण्याबाबत विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. यासोबतच शासनामार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना विना अडथळा मिळण्यासाठी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची अचूक माहिती सर्व बँकांनी तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तरुणांसाठी आश्‍वासक अशा मुद्रा योजना व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत देण्यात येणार्‍या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटकर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. त्याचप्रमाणे बचतगटांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांमार्फत देण्यात येणारे अर्थसहाय्य त्यांना आवश्यकतेनुसार कमीत कमी वेळात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

१३ हजार कोटीचा ऋण आराखडा

नाशिक जिल्ह्यासाठी नाबार्डने सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ९०० कोटींचा क्षमता आधारित ऋण आराखडा बनविला आहे. नाबार्डने पुरविलेल्या क्षमता आधारित ऋण आराखड्याला अनुसरुन जिल्ह्यातील सर्व बँकांनी अग्रणी बँकेच्यामार्फत जिल्ह्यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक ऋण आराखडा बनविला आहे. एकूण ऋण आराखड्यापैकी शेतीसाठी रुपये ७ हजार कोटी, मायक्रो स्मॉल ऍण्ड मीडियम एन्टरप्रायजेससाठी रुपये ४ हजार कोटी व इतर प्राथमिक क्षेत्रासाठी रुपये ३ हजार कोटींचे नियोजन करण्यात आले आहे.

२६ टक्क्यांनी वाढीव
२०१८-१९ या वर्षाचा ऋण प्राथमिकतेचा आराखडा रुपये ११ हजार १२५ कोटींचा असून २०१९-२० या वर्षाचा ऋण प्राथमिकतेचा आराखडा रुपये १४ हजार कोटीचा असून हा आराखडा गतवर्षापेक्षा २६ टक्क्यांनी वाढीव आहे,अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बर्वे यांनी दिली.

बैठकीच्या सुरुवातीला अग्रणी बँकेमार्फत वार्षिक ऋण योजना २०१९-२० पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊन अग्रणी बँकेमार्फत सुरू असलेल्या इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!