Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

डॉ. अभय, डॉ. राणी बंग यांना डी.लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा

Share

नाशिक | प्रतिनिधी

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टर अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी.लिट ही पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली. मंगळवारी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे विद्यापीठाची अधिसभा पार पडली. सभेचे अध्यक्ष महाजन यांनी ही घोषणा केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ऍप व एम.यु.एच.एस. हेल्थ सायन्सेस रिव्ह्यू या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायंटिफीक जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद देशपांडे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले. अध्यक्षीय भाषणात महाजन यांनी दुर्गम आदिवासी भागामध्ये तीन दशकांपासून अधिक कालावधी आरोग्य आणि सामाजिक सेवा देणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना डी.लिट पदवी प्रदान करून सन्मानित केले जाईल, अशी घोषणा केली. आरोग्य विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.

विद्यापीठातर्फे संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असून याचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या सेवकांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत योजना, विद्यार्थी व्यसनमुक्ती कार्यक्रम, परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठाच्या विकासकामांसाठी भरघोस आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या सन २०१९-२०२० अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न २१३५३.८५ लक्ष इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये २१९२९ लक्ष इतका अपेक्षित असून वित्तीय तूट रुपये ५७५.१५ लक्ष इतकी अपेक्षित आहे. प्रारंभी डॉ. संदेश मयेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाजन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!