बाजारपेठेत आकर्षक गणेशमूर्ती दाखल

नक्षीकाम केलेल्या मूर्तीला गणेशभक्तांची मागणी

0
नाशिक | प्रतिनिधी  भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थातच १३ सप्टेंबरला घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे बाप्पांची विधिवत स्थापना होणार आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल सजू लागले असून शहरात गणेशोत्सवाच्या तयारीला उधाण आले आहे.

शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, दहीपूल, डोंगरे वसतिगृहावर गणेशमूर्तींचे गाळे थाटले आहेत. विविध आकर्षक गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा गणेशमूर्तीचे नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत.

यामध्ये बालरूपातील गणेशमूर्ती, माऊली गणेशमूर्ती, महंत गणेश, सावकार बैठक, घंटीवर बसलेला गणेश, बैलगाडीत बसलेला गणेश, डंबरूवर बसलेला गणेश, फेटा गणेश, उंदीरवाहक गणेश आदी मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

गणेशमूर्ती या करमुक्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींच्या दरात वाढ झालेली नाही. गणपती व बालचमूंचे अनोखे नाते आहे. गणेशोत्सवात मुलांमध्ये चैतन्य संचारते. गणेशमूर्ती घेण्यापासून सजावट करण्यापर्यंत त्यांची प्रचंड धांदल उडालेली असते.

बाप्पा घरी येणार असल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत आहे. गणेशमूर्ती खरेदी करण्यापूर्वी अनेक पालक मुलांसह स्टॉलला भेटी देताना दिसत आहेत. आकर्षक गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी विविध स्तरातून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे अनेक भाविक शाडू मातीच्या गणेशमूर्तीसह अंकुर गणेशमूर्ती खरेदी करत आहेत.

विठुमाऊली मूर्तीचा नवीन ट्रेड

गणेशभक्तांच्या मागणीनुसार शाडू मातीच्या व पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लंबोधर, पद्मासन, सिद्धीविनायक, विठुमाऊली, दगडूशेठ गणेशमूर्ती, लालबागचा राजा, पेशवाई, सावकार, नाना पाटेकर, टिटवाळा गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. १५१ पासून ७ हजार रुपयांपर्यंत मूर्तींची किंमत आहे. यावर्षी विठुमाऊली मूर्तीचा नवीन ट्रेंड असून ती मूर्ती तयार केली आहे.
मिलिंद मोरे, विक्रेता

गणेशमूर्तीचे दर

अर्धा फूट गणेशमूर्ती – ५०० रुपये
दीड फूट गणेशमूर्ती – १५०० ते २१०० रुपये
दोन फूट गणेशमूर्ती – ३ हजार १०० रुपये
पाच फूट गणेशमूर्ती – १२ हजार रुपये

 

 

LEAVE A REPLY

*