उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी पुढे यावे

सांगवीत लाभार्थींना मोफत गॅस संचचे वितरण

1
उजनी | वार्ताहर ग्रामीण भागातील महिलांच्या बहुतांश आरोग्याच्या समस्या चुलींचा वापर व त्यामुळे निर्माण होणारा धूर यामुळे निर्माण होतात. केंद्र सरकारने सुरू केलेली उज्वला योजना महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायी असून अधिकाधिक पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख यांनी केले.

सांगवी येथे उज्ज्वला योजनेतून लाभार्थींना मोफत गॅस जोडणीचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. सांगवी गावात शेतात काम करणार्‍या मजुरांची संख्या अधिक असून दारिद्य्ररेषेखाली कुटुंबातील महिलांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने उज्ज्वला योजनेचा लाभ आवश्यक होता.

ग्रामीण भागात आजही सर्रासपणे चुलीवर स्वयंपाक करण्यात येतो. यामुळे महिलांना गंभीर व्याधींना सामोरे जावे लागते. याशिवाय जळाऊ लाकडासाठी होणारी वृक्षतोडही गंभीर आहे. उज्वला योजनेमुळे महिलांच्या आरोग्याची जपणूक होणार असून पर्यावरण संतुलन राखण्यात देखील मदत होणार आहे.

त्यामुळे या योजनेतून महिलांनी अधिकधिक गॅस जोडण्या घ्याव्यात असे आवाहन गडाख यांनी केले. याशिवाय शासनाच्या जन धन योजना, अटल पेन्शन योजना, स्वच्छ भारत अभियान आशा कितीतरी योजना आहेत. या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळात पोहोचली पाहिजे असे ते म्हणाले.

महिलांसाठी तसेच किशोरवयीन मुलींसाठी असणार्‍या आरोग्यविषयक योजनांबाबत आरोग्यसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व आशा सेविकांशी संपर्क साधण्याचे आवाहन याप्रसंगी गडाख यांनी केले.

सरकारी व वैयक्तिक लाभाची योजना असूनदेखील उज्ज्वला योजनेबाबत ग्रामीण भागात पुरेशी माहिती नाही त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवरून लाभार्थींची कागदपत्रे संकलित करण्यात आली व लाभ मिळवून देण्यात आला असल्याचे यावेळी बाजार समितीचे संचालक विनायक घुमरे यांनी सांगितले.

सुकदेव गडाख, बबन घुमरे, सखाराम रायते, केशव घुमरे, सुदाम घुमरे, संजय रायते, रेखा घुमरे, सुनीता घुमरे, भावका घुमरे, लता घुमरे आदींसह उज्ज्वला योजनेचे लाभार्थी महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थिती होते.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

*