Type to search

Featured maharashtra नाशिक

काजवा महोत्सव ‘रिस्पॉस्निबल इको टूरिझम’ व्हावा

Share

नाशिक | खंडू जगताप 

भंडारदारा येथील काजव्याचा अधिवास हा फार मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांच्या चमचमण्याचा आनंद सर्वांनी घ्यावा, परंतु जंगलाचे नियम पाळून, काजवे, वनसंपदा, वन्यजीवांना कोणतीही हानी न पोहोचता हे सर्व करावे, यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. काजवा महोत्सव हा खर्‍या अर्थाने जबाबदारीपूर्ण पर्यावरणपूरक पर्यटन व्हावे, अशीच अपेक्षा वनविभागाची असून यासाठी पर्यटक, पर्यटन महामंडळ, टूर्स आयोजक, स्थानिक नागरिक या सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून यासाठी पुढे यावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

वनविभागाचे सर्व नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी केलेल्या हुल्लडबाजीने तसेच मर्यादा सोडून अभयारण्यात वावरल्याने काजवा महोत्सवावरच गंडातर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे असे घडल्यास वन विभाग हा काजव्यांच्या तसेच वन्यजीवांच्या संरक्षणालाच प्राधान्य देईल, पर्यटन व इतर हा नंतरचा भाग आहे. असे स्पष्ट करत वन विभागाचे नियोजनानुसार दिलेल्या सर्व नियमांचे पालन होणार असेल तरच काजवा महोत्सव सुरू ठेवण्याच्या निर्णयाप्रत वनविभाग आला आहे.

याबाबत काजवा महोत्सवाशी संबंधीत सर्व विभागाची व संबंधितांची बैठक घेत वन विभागाने कडक नियम व अटी मांडल्या आहेत. ज्या पर्यावरण रक्षणासाठी योग्य असून त्यांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच इशाराही दिला आहे.

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले की, काजवा महोत्सवासाठी रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणार्‍या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजवा महोत्सवाची नियोजनबद्ध आखणी करण्यात येणार आहे. दरम्यान, खासगी वाहनांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ वन्यजीव विभागाच्या अधिकृत मिनीबसेसचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून दिला जाईल.

पर्यटकांना ठरावीक वेळेत ‘पिक ऍण्ड ड्रॉप’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी दिवाळीपासूनच काजवा महोत्सवाची तयारी सुरू करण्यात येणार आहे. सर्वांना प्रत्येक पर्यटकाची वनविभागाकडे नोंदणी आवश्यक असणार आहे. वनविभागाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. काटेकोर नियमांमध्ये हा महोत्सव होणार आहे.

संकेतस्थळ निर्माण करणार
काजवा महोत्सवाच्या पुढील हंगामापासून प्रत्येक पर्यटकाला वन विभागाकडे नोंदणी बंधनकारक असणार असून त्याशिवाय जंगलात प्रवेश दिला जाणार नाही. नोंदणीसाठी केंद्रीय नोंदणी पद्धतीने संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर काजवा महोत्सवाची सर्व माहिती तसेच नियम दिले जाणार आहेत. काजवा महोत्सवाचा आनंद सर्वांना घ्याता यावा, असेच प्रयत्न आहेत. फक्त नियमांचे पालन व्हावे व सर्वांनी काजवा महोत्सव डोळ्यात साठवावा.
– अनील अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!