Type to search

Featured नाशिक

डिजेचा दणदणाट अन् दारूपार्ट्याही

Share

नाशिक | प्रतिनिधी 

भंडारदारा येथील काजवा महोत्सवास येणार्‍या अनेक युवा पर्यटकांनी चारचाकी वाहनात डिजेचा दणदणाट केल्याचे तसेच दारूपार्ट्या करत धांगडधिंगा घातल्याचे प्रकार घडल्याने वनविभागाचा संयम संपत आला आहे. मर्यादा सोडून अभयारण्यात वावरल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने काजवा महोत्सवावरच गंडातर येण्याची शक्यता आहे.

अंधार पडू लागताच गावांपासून दूर जंगल परिसरात काजव्यांची चमचम सुरू होते. यानंतर सर्वच झाडे लखलखू लागतात तर तासाभरात नेत्रसुखद लयबद्ध चमचम, अशी चंदेरी दुनिया अनुभवण्याची संधी पर्यावरणप्रेमी तसेच शहरी नागरिकांनाही मिळावी तसेच या अभयारण्यात असणार्‍या गावातील आदिवासी, ग्रामस्थांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने काजवा महोत्सवाचे आयोजन भंडारदरा हरिश्चंद्रगड परिसरात करण्यात येते.

काजवा महोत्सवासाठी येणार्‍या सर्व पर्यटाकांना 30 रुपये प्रतिव्यक्ती या प्रमाणे शुल्क आकारून रात्री 9 नंतर जंगलात प्रवेश दिला जातो. प्रामुख्याने स्वत:च्या चारचाकी वाहनातून अनेक पर्यटक कुटुंबांसह असतात. तर अनेक वाहने युवक, युवती यांची असतात. केवळ मद्य पिणारेही असतात. हे पर्यटक कारमधील डिजे जोरात लावणे, गाडीच्या लाईट प्रखर लावणे, जोरजोरात धिंगाणा घालणे, हुल्लडबाजी करणे, वाहने मुख्य रस्ता सोडून जंगलात इतर मार्गाने नेणे असे प्रकार करतात. यासह अभयारण्यातील गावांमध्ये अशा पर्यटकांची जेवणाची सुविधा करणार्‍या स्थानिक ग्रामस्थांकडून जेवण घेऊन तेथे गोंधळ घालणे, मद्याच्या बाटल्या नेऊन पार्ट्या करणे, जंगलात शेकोट्या पेटवण्याचा प्रयत्न करणे, सिगारेट पिऊन उरलेले जळते भाग टाकून देणे असे प्रकार केले जातात.

अनेक पर्यटक काजवे पकडण्याचा किंवा ज्या झाडांवर काजवे चमकत आहे, त्या झाडांवर माती, दगड आदी वस्तू फेकण्याचा प्रयत्न करतात, यामुळे काजवे तसेच जंगलातील प्राण्यांच्या अधिवासालाही हानी पोहोचत आहे.

हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांमुळे आनंद लुटण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागतो. शनिवार तसेच रविवारी गर्दी होऊन मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांमुळे जंगलातील लहान रस्त्यांवर वाहतूक कोंडीचेे प्रकार घडून घडतात. यामुळे वन विभागावर ताण वाढत आहे. यासह वन्यजीव व प्राण्यांवरही याचा परिणाम होऊ लागला आहेे.

काजव्यांच्या अनोख्या चंदेरी दुनियाचे दर्शन व यातील आनंद सर्वांना मिळावा, अशा चांगल्या उद्देशाने हा काजवा महोत्सव सुरू झाला असला तरी शहरी मानसिकता, शहरापासून दूर जाऊन अय्याशी करण्याची विकृती, पर्यटनाचा विपर्यास व बदलती मानसिकता यामुळे हा महोत्सव अडचणीत आल्याची खरी कारणे आहेत.

49 हजार पर्यटकांची भेट

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून ते जून महिन्यात मोठा पाऊस पडेपर्यंत दुसर्‍या आठवड्यादरम्यान असा अवघा 15 ते 20 दिवसांचा हा महोत्सव असतो. काजव्यांच्या आकर्षणापोटी नाशिक जिल्ह्यासह, मुंबई, पुणे, अहमदनगरसह या जिल्ह्यांमधून तसेच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांतूनही पर्यटक हजेरी लावत आहेत.

या कालावधीत दरदिवशी सरासरी 800 ते 1500 पर्यटक या जंगलात येतात. मात्र शनिवार, रविवार व इतर सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये हा आकडा 4 ते 5 हजारांदरम्यान असतो. मागील वर्षी या दरम्यान आलेल्या पर्यटकांची संख्या 49 हजार होती.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!