बंदी केवळ कागदावरच!

प्लास्टिक, थर्माकोल सजावट साहित्यांनी व्यापली बाजारपेठ

0

नाशिक | प्रतिनिधी गणेशोत्सव काळात सजावटीसाठी थर्माकोलचे मखर, रॅपलिंग पेपर, मॅटेलिक पताकांचा वापर गणेशभक्तांकडून केला जातो. यंदा राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातली आहे. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये प्लास्टिक सजावट साहित्य व थर्माकोलचे मखरे सर्रासपणे विकले जात आहेत.

काही ठिकाणी छुप्या पद्धतीने तर काही ठिकाणी उघडपणे थर्माकोल व प्लास्टिक सजावट साहित्यांची प्रदर्शने सुरू झाली आहेत. अनेक गणेशभक्तांनी कायद्याकडे दुर्लक्ष करत त्याची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे थर्माकोलबंदी केवळ कागदावरच उरली आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थातच १३ सप्टेंबरला घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे बाप्पांची विधिवत स्थापना होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर थर्माकोलच्या जोडीला प्लास्टिकच्या फुलांचे आणि माळांचेही साम्राज्य पसरले आहे.

या माळांची किंमत शंभर रुपयांपासून सुरू आहे. प्लास्टिक फुलांच्या कमानीही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे वारंवार आवाहन केले जात असताना कानडे मारुती लेन, दहीपूल, शिवाजीरोड, महात्मा गांधीरोड, कॉलेजरोड येथील बाजारपेठांमध्ये मात्र खुलेआम थर्माकोल व प्लास्टिक सजावट साहित्य विकले जात आहे.

गणेशोत्सवामध्ये घरगुती व गणेशोत्सव मंडळांकडून आराससाठी मखरसह सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य वापरले जात होते. बाजारात मिळणार्‍या सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या साहित्यांसह थर्माकोलचे साहित्य व मेटॅलिक पताकांच्या विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे.

शहरातील कानडे मारुती लेन, दहीपूल, शिवाजीरोड, महात्मा गांधीरोड, कॉलेजरोड, गंगापूररोड, भद्रकाली, मेनरोड आदी भागातील बाजारपेठा गणेशोत्सवाच्या सजावटीच्या साहित्यांनी सजलेल्या आहेत.

मात्र अनेक ठिकाणी थर्माकोल व प्लास्टिकचे सजावट साहित्यची छुप्या पद्धतीने प्रदर्शने सुरू झाली आहेत. लोकांनाच कमी किमतीत सजावट साहित्य हवे असल्याने हे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे विक्रेते सांगत आहेत.

इको फ्रेंडली उत्सव व्हावा
प्लास्टिक व थर्माकोलबंदीमुळे नाशिककरांना यंदा गणेशोत्सव ‘इको फ्रेंडली’ साजरा करावा लागणार आहे. त्यासाठी गणेशभक्तांनी जनजागृती करावी. नैसर्गिक आणि पर्यावरणाचेे संतुलन राखणारा उत्सव म्हणून नाशिककरांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती, अंकुर गणेशमूर्ती खरेदी कराव्यात. तसेच सजावट साहित्य कागदी व कापडी खरेदी करावे.

थमाकोलला परवानगी नाही

यंदा राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातली आहे. राज्य शासनाच्या आदेशनुसारच नाशिक महापालिकेतर्फे नियमांचे पालन केले जाईल. गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांसह मूर्ती विक्रेते व सजावट साहित्य विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. थर्माकोलच्या सजावट साहित्याला कोणतीही परवानगी दिलेली नाही. विभागात कुठेही अशा प्रकारचे साहित्य आढळून आल्यास त्या विक्रेत्यांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
नितीन नेर, मनपा विभागीय अधिकारी, पश्‍चिम नाशिक

सहा विभागीय अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश
नैसर्गिक आणि पर्यावरणाचे संतुलन राखणारा गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. नाशिक शहर सुंदर व स्वच्छ राहावे यासाठी नाशिक मनपा सदैव प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या सूचनांनुसार नियमांचे पालन केले जाते. सजावटीसाठी थर्माकोलच्या वापराला मनाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मनपाच्या सहा विभागातील विभागीय अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत.डॉ. सचिन हिरे, आरोग्य अधिकारी, मनपा, नाशिक.

LEAVE A REPLY

*