आकर्षक आभूूषणांसाठी सराफी पेढ्या सज्ज

पूजेसाठी सोने-चांदीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

0
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थातच १३ सप्टेंबरला घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांतर्फे गणेशाची विधिवत स्थापना केली जाणार आहे. कल्पकता व कुशलतेला वाव देणार्‍या ‘श्रीं’च्या पूजेसाठी सोने व चांदीचे साहित्य घडवण्यासाठी शहरातील सराफांंची लगबग सुरू आहे.

सोने व चांदीच्या साहित्याच्या पूर्णत्वासाठी त्यावर कारागिरांकडून अखेरचा हात फिरवला जात आहे. सराफी पेढ्यांमध्ये आकर्षक पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्त गर्दी करू लागले आहेत.

गणेश आगमानाची गणेशभक्तांना आतूरता लागली आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गणपतीला आवडणारे जास्वंदीचे फूल, दुर्वांची जुडी, गणेशवेलाचे फूल, मोदक, उंदीर, जानवे, गणेशाच्या हातातील परशू, अंकुश यासह पाट, ताह्मण, गडवा, पेला, पळी, आसनाजवळ असलेल्या तक्क्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

पारंपरिक वस्तूंना गणेशभक्तांची अधिक मागणी असल्याने भारतीय संस्कृतीचे जतनही केले जात आहे. गणेशोत्सवासाठी अनेक गणेशभक्तांनी आतापासून तयारी सुरू केली आहे.

शहरातील टकले बंधू, टकले ज्वेलर्स, राका ज्वेलर्स, गोविंद दंडे ऍण्ड सन्स, मयूर अलंकार आदी सराफी पेढ्यांमध्ये गणेशभक्तांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिककर उत्सवप्रेमी असल्याने सराफी पेढ्यांनी अनेक आभूषणांच्या व्हारयटी विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

 

 

 

नावीन्यपूर्ण व्हरायटीज
गणेशोत्सव जगाचे आकर्षण ठरले आहे आणि गणेशोत्सवासाठी चांदीचे पूजासाहित्य व उपकरणांसाठी शहरातील विविध सराफी पेढ्या प्रसिद्ध असून गणेशभक्तांचा प्रतिसादही मिळत आहे. अनेक सराफांमध्ये सुंदर चांदीचे पूजासाहित्य उपकरणांच्या ५ हजाराहून अधिक नावीन्यपूर्ण व्हरायटीज उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चांदीचे पूजा साहित्य उपलब्ध
गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने चांदी व सोन्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्त गर्दी करू लागले आहेत. आमच्या फुलांची परडी, गणेशमूर्ती, मुकुट, दुर्वा, फुले, हार, जानवे, उदींर, मोदक, खिरापत वाटी, विडापान सुपारी, उदबत्ती घर, करंडा, पंचारती, निरंजन, समई, पळी, पंचपत्र, घंटी आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सातशे रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत गणेशपूजेचे साहित्य विक्रीसाठी आहे. या वस्तू भक्तांच्या मागणीनुसार तयार केल्या असून वेगवेगळ्या ग्रॅममध्ये आहेत. त्या भक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. – मीना दंडे, गोविंद दंडे सराफ

चांदीच्या वस्तूंना पसंती
गणेश पूजेसाठी पारंपरिक साहित्यांना गणेशभक्तांची अधिक मागणी आहे. गणेशभक्तांच्या मागणीनुसार चांदी व सोन्याचे जास्वंदीचे फूल, दुर्वांची जुडी, गणेशवेलाचे फूल, मोदक, उंदीर, जानवे, गणेशाच्या हातातील परशू, अंकुश यासह पाट, ताह्मण, गडवा, पेला,फळे तयार करण्यात आले आहेत.

या वस्तू खरेदी करण्यासाठी गणेशभक्त गर्दी करत असून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. आमच्याकडे गणेश पूजेचे साहित्य २५ रुपयांपासून उपलब्ध आहे. आकर्षक आभूषणे तयार केली असल्याने गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. – सतीश टकले, सराफ

 

 

LEAVE A REPLY

*