Type to search

Featured maharashtra नाशिक

क्षय रुग्णांची नोंदणी डॉक्टरांना बंधनकारक

Share

नाशिक | प्रतिनिधी

क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नोंदणी करणार नाही, त्या सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानाच्या अद्ययावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयीसुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच निक्षय पोषण योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत रुग्णांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु बर्‍याच रुग्णांची नोंद झाली नसल्याने दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू होतो.

बहुतेक रुग्ण क्षयरोगाच्या निदानापासून तसेच औषधोपचार यापासून वंचित राहतात. या रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी, याकरिता केंद्र सरकारने निक्षय नावाच्या ऍपची निर्मिती केलेली आहे. रुग्णांची नोंद करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकास ५०० रुपये मानधन, रुग्णांचा उपचार पूर्ण करून घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन, रुग्णांचे उपचार यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या उपचार सहाय्यकास ड्रग सेन्सिटिव्ह रुग्णांना १००० रुपये, एमडीआर रुग्णामागे ५००० रुपये, रुग्णांना आवश्यक तपासणीसाठी ५०० रुपये मानधन, अशा विविध सुविधा देण्यात येत आहेत.

क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावेत व तो बरा व्हावा, या उद्देशाने रुग्णांची नोंदणी करण्याचे आवाहन क्षयरोग केंद्राच्या मार्फत सर्व सार्वजनिक, खासगी रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिकांना केले आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५च्या) कलम २६९ आणि २७० च्या अंतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे.

सर्व सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालय, सर्व औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालविली जाणारी रुग्णालये व दवाखाने यांनी त्यांच्याकडे निदान झालेले तसेच उपचार घेणार्‍या सर्व रुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असून, त्या क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांना कळविणे बंधनकारक आहे.

दर दीड मिनिटाला एकाचा मृत्यू
बर्‍याच रुग्णांची नोंद झाली नसल्याने दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू होतो. देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यातील क्षयरुग्णांची माहिती आता निक्षय ऍपच्या माध्यमातून मिळवता येईल. ज्या रुग्णांची नोंदणी झाली त्यांना युनिक आयडी देण्यात येतो. याअंतर्गत प्रत्येक रुग्णाच्या उपचाराची स्थिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती संग्रहित असते. याद्वारे रुग्णांना कोणत्याही क्षयरोग केंद्रात उपचार करून घेता येतो. या ऍप रुग्णांच्या बँक खात्याला जोडलेले आहे. तसेच रुग्णांना पोषण आहारासाठी जी आर्थिक मदत दिली जाते, त्याची स्थिती पाहता येणार आहे. ती आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्यास या ऍपवर तक्रारही करता येते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!