नाशिककरांचा ऑनलाईन खरेदीवर भर

संकेतस्थळांवर गणेशपूजा साहित्यासाठीे सवलती सुरू

0
रंगीबेरंगी झिरमिळ्या, कापड व कागदापासून तयार केलेले इको-फ्रेंडली मखर, विद्युत दिवे अन् गणरायाच्या पूजेसाठी लागणारे विविधांंगी साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिककरांना ऑनलाईन संकेतस्थळांना पसंती दिली आहे. पूजेसाठी लागणार्‍या उदबत्ती स्टँडपासून वॉल हँगिंग दिव्यांपर्यंत कृत्रिम फुलांपासून फुलदाणीपर्यंत, मखराच्या अनेक व्हरायटीपासून रांगोळ्यांच्या स्टिकर्सपर्यंत अशा वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहेत. यंदा नाशिककरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी विविध संकेतस्थळावर भर दिला आहे.

गणेशोत्सवाच्या सजावट व पूजेसाठी लागणार्‍या साहित्याचे ऍडव्हान्स बुकिंग अनेक गणेशभक्तांनी केले आहे. ऑनलाईन खरेदीवर २० ते ५० टक्क्यांची सवलत दिली जात असून, त्यामुळे यावर्षी संकेतस्थळांवर खरेदी केली जात आहे. सजावटीच्या साहित्यापासून बाप्पाची विविध रुपे उलगडणार्‍या मूर्तीपर्यंत सर्व पर्याय विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याने घरबसल्या काहींनी खरेदीनिमित्त साधले आहे.

सजावटीच्या साहित्यामध्ये झिरमिळ्या, एलईडी दिवे, पताका, फुलांच्या माळा, वॉल हँगिंग दिवे, फुलदाण्या, मल्टिकलर बॉल्स, डेकोरेशन स्टिकर्स, आर्टिफिशल फुले, तोरण, वॉल हँगिंग तोरण आणि रंगीबेरंगी पडदे असे विविध प्रकार पाहायला मिळतात.

पूजेच्या साहित्यांमध्ये गणेशपूजा साहित्याचा बॉक्स, दिवे, धूप स्टँड, चौरंग, पाट अशा साहित्याबरोबरच बाप्पाच्या लहान मूर्ती व रांगोळीचे साहित्यही खरेदी करता येत आहे. ऑनलाईन खरेदी केल्यास विविध सवलतीही दिल्या जात आहेत.

घरबसल्या पर्याय उपलब्ध
संकेतस्थळावर गणेशपूजेसाठी विविध पर्याय पाहायला मिळत आहेत. वॉल हँगिंग दिवे, पूजेचे साहित्य ऑर्डर केले होते. त्यावर सवलतही मिळत आहे. ऑनलाईन खरेदीमुळे वेळ व खर्चाची बचत असून, हा नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन खरेदीकडे वळत आहेत.

वेळ, खर्चाची बचत
घरबसल्या फ्लिपकार्ड, अँमेझॉनसारख्या अनेक संकेतस्थळांवरुन गणेशपूजेचे साहित्य खरेदी करता येत आहे. ऑनलाइन खरेदी करताना पर्यायी साहित्य पाहता येते. त्यातून वेळ व खर्चाची बचत होत आहे. ऑनलाइन खरेदीसाठी अनेक अँप्सही उपलब्ध झाले असून, साध्या व सोप्या पद्धतीने खरेदी करता येत आहे.
– भूषण थोरात, नागरिक

ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्या
ऑनलाइन खरेदी करताना संकेतस्थळ एचटीटीपीएसने सिक्युअर व हिरव्या रंगाचे छोटे लॉक असल्याची खात्री करुन घ्यावी. ऑनलाइन खरेदी शक्यतो कॅशऑन डिलिव्हरीने करावी. ऑनलाइन पेमेंट करायचे असेल तर क्रेडिट कार्डने करावे. कारण फसव्या संकेतस्थळांव्दारे फसवणूक होऊ शकते. क्रेडिट कार्डने पेमेंट करताना फसवणूक झाली, तरी बँक ती रिकव्हर करू शकते. ऑनलाइन खरेदी करताना विक्रेता कोण व कुठला आहे ते पाहून घ्यावे व त्या संदर्भातील इतरांच्या प्रतिक्रिया वाचून घ्याव्यात. एक्सपायरी तारीखही पहावी. ऑनलाइन खरेदी घरच्या संगणक किंवा स्वत:च्या मोबाईलमधूनच करावी. सार्वजनिक वायफाय वापरू नये. त्यातून हॅकिंग होण्याची शक्यता असते. -तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

 

LEAVE A REPLY

*