Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लुटीच्या घटनांनंतरही एटीएमची सुरक्षा रामभरोसेच

Share

नाशिक |  निशिकांत पाटील  

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात सातत्याने एटीएम फोडण्याच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या सुचनांकडे बँक प्रशासन दुर्लक्ष करीत असून एटीएम मशिनमधील लाखो रुपयांची सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे दिसून येत आहे.

बँकांच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी बँकांनी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या एटीएम मशिनमध्ये लाखो रुपये ठेवले जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी बँकांकडून केले जाणारे उपाय तोकडे असल्याचे दिसते.

त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी गेल्या महिन्यात जेलरोड येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून १३ लाख रुपयांचे चोरून नेले. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच मखमलाबाद गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून ३१ लाख ७५ हजार ९०० रुपये पळवून नेले. त्यानंतर सातपूर कॉलनी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएमही फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.

या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सर्वच बँकांना एटीएम सुरक्षेविषयी सूचना दिलेल्या असतानाही जवळपास सर्व बँक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा सातपूरमधील आयसीस आयसीआय बँकेचे एटीएम मशिनच चोरून नेण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

बँकांचे उदासीन धोरण
‘एटीएमची सुरक्षा’ हा विषय कायमच चर्चेत राहिलेला आहे. एटीएम मशिनमध्ये होणारे फेरफार, सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा असले तरी ते बंद स्थितीत असणे, मशिन वारंवार बंद राहाणेे अशा प्रकारांंमुळे बँकेचा ग्राहक, सामान्य नागरिक अगोदरच त्रासलेला आहे. त्यातच पूर्वी एटीएम मशिनच्या की पॅडमध्ये फेरफार करून किंवा बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे लंपास करणार्‍या चोरट्यांची मजल आता थेट एटीएम मशिन फोडण्यात किंवा ते उचलून नेण्यापर्यंत गेली आहे आणि त्याला कारण आहे सुरक्षेचा आभाव. बँक व्यवस्थापन मात्र सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत उदासीन असल्याने नागरिकांमध्ये चिंतेसह संतापही व्यक्त होत आहे.

आईजीच्या जीवावर…
पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. विविध एटीएम केंद्रांवर पोलिसांचे बारकोड लावण्यात आले आहेत. बिट मार्शल, गस्ती पथकाने या ठिकाणी जाऊन ते बारकोड स्कॅन करणे अर्थात त्या परिसरात पोहोचणे आवश्यक असल्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र या योजनेचाच फायदा बँक प्रशासन घेते की काय अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. बारकोड स्कॅन करण्यासाठी पोलीस एटीएमजवळ येणार असल्यानेच पोलिसांच्याच भरवशावर एटीएमची सुरक्षा सोपवून बँकेने स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमले नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

असे असावेत उपाय
* प्रत्येक एटीएममध्ये सुरक्षा रक्षक.
* मशिनमध्ये छेडछाड होत असल्यास अलार्म सिस्टिीम.
* सीसीटीव्हीचा चांंगला दर्जा.
* एटीएमच्या आत व बाहेर छुपे कॅमेरे.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!