Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनपाची शहर बस फेब्रुवारीत धावणार रस्त्यावर

Share

नाशिक । प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शहर बससेवेला चालविण्यासाठी तीन ऑपरेटर यांना काम देण्यास महापालिका स्थावी समितीने मंजुरी मिळाल्यानंतर आता ऑपरेटरकडून करारनामा करून घेण्याच्या कामाला विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. असे असले तरी यासंदर्भातील पायाभूत सुविधासंदर्भातील कामांना महापालिकेने वेग दिला असुन आचारसंहिता संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या काही बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावणार आहे. यामुळे नाशिककरांना शहर बससेवेसाठी अजून चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, सक्षम वाहतुकीला पर्याय आणि प्रदूषण मुक्त शहर अशा बाबी लक्षात घेत नाशिक महापालिकेने शहर बससेवा सुरू करावीत अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने कॉम्प्रेहेन्सीव ट्राफिक अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्टेेशन प्लॅन तयार करुन यास चालना दिली होती. याकरिता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

यात स्मार्ट सिटी कंपनीची सल्लागार कंपनी असलेल्या केपीएमजी यांच्याकडुन शहर बससेवा सुरू करण्यासाठी निवीदा प्रक्रिया पुर्ण केली होती. ग्रॉस कॉस्ट कॉन्टॅक्ट तत्वावर ही बस चालविण्यात येणार असुन याकरिता तीन ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. या एकुणच प्रकल्पाला १७ सप्टेंबर  रोजी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

मात्र, २१ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागु झाल्याने यासंदर्भातील ऑपरेटर कंपन्यासोबत होणार्‍या करारनाम्यास ब्रेक लागला आहे. असे असले तरी संबंधीत कंपन्यांकडुन येणार्‍या बसेस साठी बस तयार कंरणार्‍या कंपन्यांना ऑर्डर देण्यात आल्या असल्याने पहिल्या टप्प्यात निम्म्या बसेस येत्या फेब्रुवारी २०२० पर्यत शहराच्या रस्त्यावर धावणार आहे. तो पर्यत बस सेवेसाठी लागणारे डेपो, वर्कशॉप, बसस्थानके अशा पायाभूत कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडुन कामे पुर्ण केले जाणार आहे.

बसेस करिता ८०० वाहक
महापालिका शहर बससेवा सुरू करतांना बसचे संचलन व दुरुस्ती देखभाल ही संबंधीत ऑपरेटरकडे राहणार आहे. मात्र या बसवरील वाहनाची जबाबदारी महापालिकेवर आहे. ४०० बसेस साठी दोन सत्रात ८०० वाहकांची गरज असुन हे वाहक आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. शहरातील सध्याच्या बस रुटचा अभ्यास करण्यात आला असुन यादृष्टीने आता याचे नियोजन केले जात आहे.

मोठ्या रस्त्यावरच धावणार
शहरातील रस्त्यांचा विचार करुन एस. टी. प्रमाणेच आकाराच्या डिझेल व सीएनजी बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र इलेक्ट्रीक बसेसचा आकार मोठा आहे. हे लक्षात घेता या बसेस नाशिकरोड ते नाशिक शहर आणि नाशिक शहर ते सातपूर अशा मार्गावर धावण्यात येणार असुन यासंदर्भातील नियोजन केले जात आहे.

डेपोच्या कामाची निविदा तयार
शहरातील नाशिकरोड भागातील आनंदनगर येथीेल एस. टी.ची जागा असलेल्या ठिकाणी डेपो कार्यरत करण्यात येणार आहे. हा डेपो सिंंहस्थ कुंभमेळ्यात वापरण्यात आला असुन आता याठिकाणी केवळ रस्ता डांबरीकरण करुन याचा उपयोग केला जाणार आहे. तसेच आडगांव ट्रक टर्मिनल, पाथर्डी फाटा, सिन्नर फाटा याठिकाणी पीपीपी तत्वावर डेपो विकासीत करण्यात येणार असुन याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत काही बस स्थानके विकसीत करण्यात येणार आहे. तसेच निमाणी, सातपूर व सीबीएस अशी बसस्थानके एस. टी. च्या ताब्यात राहणार असुन याचा उपयोग महापालिका करणार आहे. तसेच महापालिकेच्या तयार बस स्थानक व डेपोचा वापर एस. टी. करणार आहे. अशाप्रकारे महापालिका बससेवेकरिता पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!