Type to search

Featured maharashtra नाशिक

मनमाड शहरात पाणीबाणी

Share

मनमाड| प्रतिनिधी

एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाण्याचा मृत साठाही संपुष्टात आला आहे. दुसरीकडे जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणात खालावल्याने बहुतांश बोअरवेल बंद पडले आहेत. नवीन बोअरवेल घेणार्‍यांना तब्बल ३०० फूट खोल पाणी लागत नसल्याने मनमाड शहरात अभूतपूर्व पाणीबाणी निर्माण झाली आहे.

वापरण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाईपलाईनमधून गळती होऊन रस्त्यावरून वाहून जाणारे घाण पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.पाण्याविना शहर सोडण्याची वेळ येणार नाही ना, अशी भीती सव्वालाख नागरिकांना वाटत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणी साठा संपल्याने शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला तोंड देत असलेल्या शहरातील नागरिकांनी या समस्येवर मात करण्यासाठी स्वतः बोअरवेल करून घेतले तर पालिका प्रशासनाने देखील ठिकठिकाणी बोअरवेल घेतले. त्यामुळे नागरिक नळाद्वारे येणारे पाणीे पिण्यासाठी तर बोअरवेलचे पाणी कपडे, भांडी, धुणे व आंघोळीसाठी वापरत होते. शहरात इतके बोअरवेल करण्यात आले आहे की, अगदी जमिनीची चाळण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस जेमतेम पडल्याने जमिनीत पाणी जिरले नाही. त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत.

जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने अनेक बोअरवेल बंद पडले तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ३०० फूट खोल बोअरवेल करूनदेखील पाणी लागत नसल्याचे पाहून लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या पालिकेतर्फे शहरात महिन्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो; मात्र सदर पाणी पिण्यासाठी कमी पडते.

इतर कामासाठी लागणारे पाणी आणायचे कुठून, असा यक्षप्रश्‍न नागरिकांना पडला आहे. एखाद्या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन लिकेज होऊन त्यातून रस्त्यावर साचलेले गढूळ पाणी घेऊन टाकीत भरून ठेवले जाते. त्यातील माती व घाण तळाला बसल्यानंतर हे पाणी इतर कामासाठी वापरण्याची वेळ यंदा नागरिकांवर आली आहे.

सर्वांनी वार्‍यावर सोडले
दुष्काळ केवळ मराठवाड्यातच नाही; तर मनमाडसारख्या सव्वालाख लोकसंख्या असलेल्या शहरात देखील आहे. येथील परिस्थिती लातूर पेक्षाही कठीण झाली असताना देखील लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी व अन्य अधिकार्‍यांनीही शहराला जणू वार्‍यावर सोडल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!