Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बँक अधिकार्‍यांचा नियोजित संप स्थगित; गुरुवारी, शुक्रवारी बँका सुरू राहणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

देशातील बँक अधिकार्‍यांच्या चार वेगवेगळ्या संघटनांनी वेतनविषयक मागण्या व सरकारच्या बँक विलिनीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी गुरुवार (दि२६) पासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागे घेतला आहे. केंद्रीय वित्त सचिवांसोबत संघटना प्रतिनिधींची सोमवारी दिल्लीत बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गुरुवारी व शुक्रवारी बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत.

केंद्र सरकारने देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या बँकांमधील हजारो सेवकांच्या नोकर्‍यांवर गदा येण्याची भीती आहे. बँक विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी तसेच नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असणारा सुधारित वेतन करार लागू करण्याच्या मागणीसाठी बँक अधिकारी आंदोलनाच्या तयारीत होते. त्यासाठी चार संघटना आंदोलनात उतरणार होत्या.

दि.२६ व २७ सप्टेंबर असे दोन दिवस संप केला जाणार होता, तर २८ तारखेला चौथा शनिवार व २९ तारखेला रविवार असल्याने साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार होत्या.

सोमवारी संघटना प्रतिनिधींसोबत सरकारची बैठक पार पडली. केंद्रीय वित्त सचिव राजीवकुमार यांनी या बैठकीत बँक अधिकार्‍यांच्या अडचणींसंदर्भात सरकार स्तरावर योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. वे

तनवाढीचा काही बँकांच्या व्यवस्थापन मंडळांचा विरोध आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे राजीवकुमार यांनी सांगितले. याशिवाय बँकांच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर अभ्यास समिती नेमण्यात येईल.

या समितीत बँक अधिकारी व सेवक संघटनांचे प्रतिनिधी सामावून घेतले जातील, असेही ते म्हणाले. सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर गुरुवारपासूनच नियोजित संप मागे घेण्यात आल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!