जॉर्ज फर्नांडिस कष्टाची जाणीव असणारे कामगार नेते

विविध संस्था संघटनांकडून श्रद्धांजली

0
नाशिक | प्रतिनिधी  जॉर्ज फर्नांडिस हे देशभरातील कष्टकर्‍यांचे नेते होते. संरक्षण मंत्री असूनही त्यांनी मोठेपणा मिरवला नाही. चळवळीसाठी कायम पुढे ते असत, त्यांना कामगारांच्या कष्टांची जाणीव होती. यापुढे कामगारांसाठी लढा देणे हीच जॉर्ज यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे रविवारी (दि. ३) येथे आज दुपारी शहरातील पुरोगामी संस्था, संघटना, पक्ष व कामगार संघटनांतर्फे फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा झाली. ज्येष्ठ कामगारनेते शांताराम चव्हाण सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे नेते माधव भणगे म्हणाले की, फर्नांडिस यांनी शासकीय कर्मचार्‍यांच्या लढ्याचे नेतृत्व केले व त्यांना न्याय मिळवून दिला. संरक्षणमंत्री असताना त्यांनी थेट सीमेवर जाऊन सैनिकांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्या सोडविल्या.
कामगारनेते राजू देसले यांनीही कामगारांसाठी लढा देणे हीच जॉर्ज यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगितले. यावेळी अनेकांनी फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा दिला.
एचएएल कामगार युनियनचे माजी अध्यक्ष कुमार औरंगाबादकर म्हणाले की, फर्नांडिस यांना प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाची जाणीव व मताची किंमत होती. त्यांच्या मासिकातील एक चूक त्यांना पत्र पाठवून निदर्शसास आणून दिली असता, त्यांचे तत्परतेने उत्तर आले व पुढच्या अंकात चूक दुरुस्त करीत असल्याचे कळविले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ‍‍‍‍‍‍‍‍‌‌‍‌‍‌‍‌‍‌‍ अॅड. रवींद्र पगार यांनीही आदरांजली अर्पण केली. दहा वर्षे जगापासून दूर असूनही जॉर्ज यांच्या निधनानंतर सर्वांना धक्का बसला, यातूनच त्यांचा सर्वांवर किती प्रभाव होता, याची प्रचिती येत असल्याचे ते म्हणाले.
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला खासदार निधीतून पाच लाख रुपये देणारे ते एकमेव नेते होते, अशी आठवण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी सांगितली.श्रीधर देशपांडे यांनी जॉर्ज यांनी पुकारलेल्या देशव्यापी रेल्वे संपाच्या आठवणी जागविल्या. संप कधी पुकारावा, चर्चा कधी करावी, संप कधी मागे घ्यावा याबाबतच्या अनेक बाबी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते राम गायटे, मुकुंद दीक्षित, वसंत एकबोटे, श्यामला चव्हाण, सचिन मालेगावकर, गौतम सुराणा, मनोहर अहिरे, अनिता पगारे आदींसह विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*