पेठ-सुरगाण्यात नवजात शिशू केंद्र

आरोग्यमंत्री दीपक सावंत : साथ आजाराबाबत घरोघरी जाऊन तपासणीचे आदेश

0

नाशिक | प्रतिनिधी  आदिवासी भागातील बालमृत्यू रोखावे आणि नवजात शिशूना अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंंबकेश्‍वरप्रमाणेच पेठ आणि सुरगाण्यात प्रत्येकी ६ खाटांचे नवजात शिशू देखभाल केंद्र (एनआयसीयू) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

तसेच नाशिक येथील ४ मनपा रुग्णालयांपैकी एका ठिकाणी एनआयसीयू सुरु करण्यात येईल असे सावंत म्हणाले. या केंद्राचा लाभ पेठ-सुरगाण्यापासून ते धुळे, नंदुरबार येथील आदिवासी बांधवांना होईल, असा विश्‍वासही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील साथरोग व आरोग्य विभागाचा आढावा डॉ. सावंत यांनी गुरुवारी (दि. ३०) घेतला. त्यानंतर डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये गरोदर माता व नवजात बालकाला वेळेत उपचार मिळत नसल्याने बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते.
परंतु, गेल्या वर्षभरात आरोग्य विभागाने या तालुक्यांमध्ये चांगले काम केले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
त्यासाठी गरोदर माता व नवजात शिशुंना अत्याधुनिक उपचार वेळेत मिळावे, यासाठी त्र्यंबकेश्‍वरमध्ये एनआयसीयू केंद्र प्रस्तावित केले आहे. त्याचधर्तीवर पेठ व सुरगाण्यात असेच केंद्र उभारणीसाठी प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
रिक्त पदभरती नाही
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे या जागांवर भरती करणार का? या प्रश्‍नावर बोलतांना डॉ.सावंत यांनी शासनाने भरती बंद केली असल्याने सध्या तरी ही पदे भरली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
प्रशासनाला आदेश
नाशिक महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याबाबत डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांंमध्ये साथीचे आजार होणार नाही, याबाबत जनजागृती करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. भित्तीपत्रके लावण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले. दरम्यान, ज्या भागात रुग्ण आढळतील तेथे मॅपिंग करून फवारणी करावी, अशा सूचना दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
वेलनेस केंद्र स्थापणार
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात वेलनेस केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात बीएचएमएस डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. या डॉक्टरांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन नंतर सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
नागरिकांना आवाहन
वातावरण बदलामुळे राज्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूसारखे आजार बळावत आहे. मात्र, गतवर्षापेक्षा यंदा डेंग्यूमुळे मृत्यू कमी झाले, असले तरी ते होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. साथीचे आजार बळावू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी आठवड्यातून एकदिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खासगी रुग्णालयांनी तसेच डॉक्टरांनी त्यांच्याकडे डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण दाखल झाल्यास त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या ए, बी व सी प्रक्रियेनुसार उपचार करावेत, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

LEAVE A REPLY

*