नाशिकचा रणसंग्राम : चांदवड येथे आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा

कंटेनर वाहन चालकाविरुद्ध कारवाई

0

चांदवड |प्रतिनिधी

आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी चांदवड पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुठल्याही निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी न घेता कंटेनर वाहनास काँग्रेस पक्षाचे बॅनर लावल्याने चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आदर्श आचारसंहिता असल्याने निवडणूक काळासाठी सहायक निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी स्थापन केलेले तपासीपथक विविध भागांत कसून वाहन तपासणी करत आहे. हे पथक मंगरूळ टोलनाका येथे वाहन तपासणी करत असताना, नाशिक कडून मालेगावच्या दिशेने कंटेनर क्रमांक ( एम. एच. ०४ जी. एफ. ९५५८) जात असताना त्यावर काँग्रेस पक्षाचे ३२ फूट लांब व १२ फूट उंचीचे बॅनर लावलेले होते. यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिन्ह, राहुल गांधी यांच्या फोटोसह पक्षाची जाहिरात करण्यात आली; मात्र असे करताना कंटेनरच्या दर्शनी भागात याबाबत परवानगी असल्याचे पत्र लावण्यात आले नव्हते.

शिवाय चालक व क्लिनर या दोघांनाही संबंधित बॅनरबाबत परवानगी असल्याचे कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भंडारे यांच्या आदेशानुसार तपासणी पथक प्रमुख सतीश कांबळे यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस स्थानकात आदर्श आचारसंहिता भंगप्रकरणी चालक वीरेंद्रसिंह मिश्रीलाल बघेल (२६) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर चांदवड पोलीस स्थानकात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पथक प्रमुख प्यारेलाल भिडे, पो. हवालदार उत्तम गोसावी, किशोर लोहार, श्याम वाघ, स. पो. उपनिरीक्षक सुरेश अहिरे, सुनील पिगटे, फोटोग्राफर अरुण वाळुंज यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

*