गंगापूर धरणात शहराला पुरेल इतका साठा

जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन

0
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूह व दारणा धरणात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात नाशिक शहरात पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही कपात करावी लागणार नाही. नाशिक शहराला गंगापूर, दारणा धरणातून देण्यात आलेल्या पाणी आरक्षणानुसार ३१ जुलैपर्यंत म्हणजे १०८ दिवस पुरेल इतक्या साठ्यापेक्षा जास्त पाणी धरणात शिल्लक आहे.
यामुळे नाशिककरांना कोणत्याही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नसले तरी जिल्ह्यातील पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे १७ लाख इतकी अधिकृत लोकसंख्या असली तरी प्रत्यक्षात शहरातील लोकसंख्येचा आकडा २० लाखांच्या वर गेला आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यंदा गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ४०० दशलक्ष घनफूट असे ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण दिलेले आहे.
तसेच महापालिकेसाठी नव्याने कार्यरत होत असलेल्या मुकणे थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी मुकणे धरणातून शहराला ३०० दशलक्ष घनफूट इतके आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणापैकी गंगापूर धरण समूहातूनच महापालिका सर्वाधिक पाणी उचलत आहे. यामुळे गंगापूर धरणात पुरेसा साठा असल्यास शहरावर पाणीकपातीची वेळ येत नाही. सन २०१२ मध्ये पाऊस कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपात केली होती. त्यानंतर अशी वेळ महापालिकेवर अद्याप आलेली नसून गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर समूह व दारणात अजून पाणीसाठा चांगला आहे.
यामुळे महापालिकेला ३१ जुलैपर्यंत शिल्लक असलेले १०८ दिवस नियमित पाणीपुरवठा होणार आहे. यात नुकतेच स्कायमेटने यंदा ९६ टक्के समाधानकारक पावसाचे भविष्य वर्तवल्याने देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात पाणीटंचाई जाणवणार नसली तरी नांदगाव, येवला, सिन्नर यासह काही तालुक्यांत नागरिकांना तीव्र पाणीटंचाईसोबत झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या २०० च्या वर गेली आहे. जिल्ह्यात एकीकडे अशाप्रकारे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना नाशिककरांनी पाणी वाया घालवू नये याकरिता नाशिक महापालिका प्रशासनाने पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.
असे आहे पाणी बचतीचे आवाहन
* सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे
* पाणी शिळे होत नाही. त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये
* आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये
* पाणी साठवण्यासाठी जमिनीत टाकी/सम्प नसल्यास ते बांधावे
* पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घेणे
* नळीचा वापर करून वाहने धुवू नये व सडा मारू नये
* नळ कनेक्शनला डायरेक्ट मोटार /पंप बसवू नये
..तर पाणी वाया घालवणार्‍यांवर कारवाई
महापालिकेने पाणी वाचवण्यासाठी काही मुद्यांवर नागरिकांना आवाहन केले आहे. महापालिकेच्या या आवाहनाला न जुमानता पाणी वाया घालवण्याचे काम कोणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याचा फोटो व त्या ठिकाणचा सविस्तर पत्ता व इतर तपशील संबंधित महापालिका विभागीय अधिकारी, उपअभियंता यांच्या मोबाईल फोनवर व्हॉटस्ऍपवर माहिती पाठवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

LEAVE A REPLY

*