शहरातील ३७ गुंडांची तडीपारी

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई

0

नाशिक | प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून सराईत गुंडांसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुमारे ३७ गुंडांची तडीपारी करण्यात आली आहे. ही कारवाई तीन महिन्यातील असून, परिमंडळ एकमधून २६ तर, परिमंडळ दोनमधून ११ गुंडांना शहर-जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.

मागील वर्षभरात गुंडाविरोधात सुरू असलेल्या कारवाईत सुमारे दीडशे गुंडांची तडीपारी करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांमध्ये एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल सराईत गुन्हेगारांची माहिती संकलन करण्यात आली.

तसेच, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांचीही माहितीचा त्यात समावेश करण्यात आला होता. त्यानुसार, पोलिस ठाण्यांकडून प्रस्ताव मागवून सराईत गुन्हेगारांना तडीपारीच्या नोटिसा बजावून त्यांना एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी शहर-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

त्यानुसार, परिमंडळ एकअंतर्गत जानेवारी ते आतापर्यंतच्या कालावधीत २६ सराईत गुंडांची तडीपारी करण्यात आली. यात सर्वाधिक गुन्हेगार पंचवटी हद्दीतील असून, त्यापाठोपाठ सरकारवाडा, भद्रकालीच्या हद्दीतील आहे.

भद्रकालीत विविध गुन्हे दाखल असलेला इस्तियाक कोकणी याचाही तडीपारीमध्ये समावेश असून राजकीय पुढार्‍यांसह सराईत गुन्हेगारांना अर्थपुरवठा त्याच्याच माध्यमातून होत असल्याचे बोलले जाते.

त्याचप्रमाणे, परिमंडळ दोन अंतर्गत चालू वर्षात ११ सराईत गुंडांची तडीपारी करण्यात आली. यातील ७ गुंडांची २ वर्षांसाठी तर एकाची एका वर्षासाठी शहर-जिल्हा हद्दीतून तडीपारी करण्यात आली.

परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ दोनचे उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडे अद्यापही शेकडो सराईत गुंडांच्या तडीपारीच्या प्रस्तावांची चौकशी सुरू असून काही दिवसात आणखी काही गुंडांची तडीपारी होण्याची शक्यता आहे. तर, एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या शेकडो गुंडांच्या तडीपारी प्रस्तावांची चौकशी पोलिस उपायुक्तांकडे सुरू आहे.

पोलीस ठाणे निहाय तडीपार कारवाई
पंचवटी (१३), आडगाव (४), भद्रकाली (३),
मुंबई नाका (१), सरकारवाडा (४), गंगापूर (१),
सातूपर (५), सातपूर (४), अंबड (६),
इंदिरानगर (१)

LEAVE A REPLY

*