Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

Share

नाशिक । प्रतिनिधी 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सायंकाळी शहरात दाखल झाले. ओझर विमानतळावर विभागीय आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकरी तसेच मिलिटरीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, ओझर ते नाशिक येथील शासकीय विश्रामगृह असा त्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने आला. यासाठी महामार्गासह शहरात विविध ठिकाणी वाहतूक रोखण्यात आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅटस्) ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शहरात दाखल झाले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी गांधीनगरच्या कॅटस् मैदानावर मुख्य सोेहळा पार पडणार आहे. त्यासाठी ते ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ने शासकीय विश्रामगृहावरून गांधीनगरकडे रवाना होणार आहेत.

आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास विशेष विमानाने राष्ट्रपतींचे ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी ओझर विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी, पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस निरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच मिलिटरीचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ओझर विमानतळ ते दहावा मैल असा संपूर्ण मार्गावर कडेकोट बंदोबस्त नेमला होता. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली होती. तर शहरात दहावा मैल ते शासकीय विश्रामगृह असा कडेकोट बंदोबस्त नाशिक शहर पोलिसांनी तैनात केला होता.

दरम्यान, राष्ट्रपतींचा कॅन्वॉय जाणार्‍या मार्गावरील इतर सर्व रस्ते बंद केल्याने सुमारे तासभर नागरिकांना ताटकळावे लागले. द्वारका चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अंतर्गत सर्वच मार्ग बंद करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे या परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

विश्रामगृह परिसरात येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला. गुरूवारी १० ऑक्टोबरला सायंकाळपर्यंत ही बंदी कायम असणार आहे. वाहनचालकांना चांडक सर्कल, तरणतलाव त्र्यंबकरोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येणार आहे.

 

‘सेना विमानन कोर’ला ‘प्रेसिडेंट कलर’ पुरस्कार

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रूपस् यांच्या माध्यामतून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या गुरुवारी ‘सेना विमानन कोर’ला ‘प्रेसिडेंट कलर’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.

यावेळी महानिर्देशक कर्नल कमांडंट ले. जनरल कवलकुमार (अतिविशिष्ट सेवा मेडल) उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणार्‍या पथसंचलनाचे नेतृत्व सेना विमानन कोर प्रशिक्षण स्कूलचे ब्रिगेडियर सरबजितसिंग बावा भल्ला करणार आहेत.

सियाचीनसारख्या दुर्गम आणि बर्फाळ भागासोबतच कच्छच्या रणक्षेत्रातही या दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचादेखील सन्मान केला जाणार आहे.

त्यानंतर स्कूल ऑफ आर्टिलरी येथे ‘रूद्रनाद’ या आर्टिलरी म्युझियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्कूल ऑफ आर्टिलरीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २ बाय ५ फुटाची भव्य ‘सेन्टेनरी ट्रॉफी’देखील प्रदान केली जाणार आहे. यावेळी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार आहे. आर्टिलरीच्या माध्यमातून त्यांना ते भेटही दिले जाणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!