मोकाट जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर; विद्यार्थ्यांमध्ये भीती

0
नवीन नाशिक | वार्ताहर महाकाली चौकात मोकाट गायिंनी शाळेत जाणार्‍या ७ वर्षाच्या बालकास तुडवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असताना अशाच प्रकारची मोकाट जनावरे उत्तमनगर शाळेजवळ तसेच पाथर्डी फाटा येथील गजानन कॉलनी व मुरलीधरनगरात सातत्याने फिरत असल्याने केव्हाही मोठा हल्ला वृद्ध महिला व शाळकरी मुलांवर होण्याच्या भितीने विद्यार्थ्यांनी व पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मोकाट जनावरांच्या बाबतीत प्रशासनाकडून चालढकल व दिरंगाई होत असल्याने रहिवाशांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. एखादी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी घडलेला प्रकार हा खूपच भयावह होता. त्या प्रकारानंतर मनपा प्रशासनातर्फे मोकाट जनावरांवर बंदोबस्त करण्याचे आश्‍वासन दिले गेले खरे मात्र ते कागदोपत्रीच राहिले असल्याचे जाणवत आहे.
अजूनही नवीन नाशिक परिसरात अतुल डेअरीजवळ असलेल्या प्राथमिक व डॉ. शालिनीताई बोरसे माध्यमिक शाळेजवळ सकाळी अनेक मोकाट जनावरे चरण्यासाठी बाहेर पडत असतात.
लहान विद्यार्थ्यांची सकाळची शाळा असल्याने अनेक महिला व पालक आपल्या लहानग्यांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी येत असतात. रस्त्याने चालत येणार्‍या या जनावरांपैकी एखादे जनावर बिथरल्यास व येणार्‍या विद्यार्थी व महिलांवर हल्ला केल्यास मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे.
या मोकाट जनावरांचे मालक सकाळच्या प्रहरी आपल्या जनावरांना सोडून देवून निर्धास्तपणे राहात असल्याने व प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने अद्यापपावेतो या मोकाट जनावरांचा बंदोबस्त होऊ शकला नाही.
याच रोडवर सकाळी अनेक वृद्ध व महिला दूध घेण्यासाठी व फिरण्यासाठीही बाहेर पडतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होण्याची शक्यता त्यांनीही वर्तवली आहे. अशा या जनावरांचा बंदोबस्त प्रशासनाने केल्यास होणारी दुर्घटना टळू शकेल.
पाथर्डी परिसरातही अनेक शेतकरी कुटुंब राहात असल्याने त्यांच्याकडे असलेल्या गायी, म्हशी ते चरायला सोडतात व त्यामागे कोणीही नसल्याने वाट मिळेल त्या दिशेने ही मोकाट जनावरे जात असतात.
याही परिसरातून शालेय विद्यार्थी व महिलांचा सकाळी नित्यनेम जाण्याचा असल्याने तेथेही मोकाट जनावरांपासून रहिवाशांना त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोकाट सुटलेल्या या जनावरांमागे कोणीही त्याला वाली नसतो. त्यामुळे त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पादचार्‍यांना आपल्या परिने मार्गक्रमण करावे लागते. या सर्व बाबतीत प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळकरी विद्यार्थी, पालक व रहिवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*