महिला दिन विशेष : वृत्तपत्र विक्रेतीची प्रेरणादायी ‘कहाणी’

0
दे. कॅम्प | वार्ताहर संसारात पतीला साथ देताना वृत्तपत्र विक्रेता म्हणून कोणताही कमीपणा न ठेवता तब्बल २८ वर्षांपासून भगूर येथील एसटी स्टॅण्डवर वृत्तपत्र विक्रेती म्हणून काम करणार्‍या आरती पांडुरंग आडके यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
१९९० मध्ये पती पांडुरंग आडके यांच्या पेपर स्टॉलवर विक्रेती म्हणून काम करताना सर्व प्रकारचा अनुभव घेतला. १९९८ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर न डगमगता हा व्यवसाय धैर्याने पुढे नेताना संसाराचा गाडा व्यवस्थित हाकला.
एक मुलगी व दोन मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करत त्यांना सांसरिकदृष्ट्या स्थिरस्थावर केले. व्यवसायात आर्थिक चणचण भासत असताना कोणाकडे हात न पसरता प्रसंगी अंगावरचे दागिने गहाण ठेवले.
या दरम्यान कधीही त्यांनी वृत्तपत्र एजन्सीचे बिल थकवले नाही. पतीने सुरू केलेला व्यवसाय कष्टप्रद असला तरी प्रामाणिकपणा आरती यांच्या नसानसांत भिनला असल्याने हिच परंपरा त्यांनी पुढे आपल्या मुलांना शिकवली. त्यामुळे देवळाली कॅम्प, भगूर परिसरातील आडके परिसरातील हा व्यवसाय सर्व वृत्तपत्रांसह सामाजिक संस्थांना परिचित आहे.
केवळ एका दैनिकावर सुरू केलेला हा व्यवसाय आजमितीस हजाराहून जादा दैनिकांची दररोज विक्री करत आहे. सोबतीला साप्ताहिक, पाक्षिक, दिवाळी अंक, मासिक, धार्मिक ग्रंथ, स्टेशनरी आदींची विक्री होते. शालेय विद्यार्थ्यांना नवीन योजनांची माहिती देणे, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणे हे कामही या माऊली नेटाने पार पाडतात.
जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा विविध सामाजिक संस्थांकडून गौरव केला जातो. कोणत्याही परिवाराने आपल्या माता-पित्याचे आदेश मानून त्यावर वाटचाल करावी, असे केल्यास जीवनात कोणीही मागे राहणार नाही, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
व्यवसाय छोटा असला तरी प्रामाणिकपणे केल्यास निश्‍चितपणे भरभराट होते. वृत्तपत्र विक्रेत्या म्हणून काम करताना बरेवाईट अनुभव आले तरीही आपल्या ध्येयापासून त्या कदापी मागे हटल्या नाहीत. प्रामाणिकपणामुळेच पंचक्रोशीत त्या आदरस्थान बनल्या आहेत.

LEAVE A REPLY

*