महिला दिन विशेष : महिलांचा सन्मान हाच ‘महिलादिन’

0
नाशिक | गोकुळ पवार 
दिवस कोणताही असो, स्त्री सन्मान आजची गरज आहे. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेऊन स्रियांना सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे, त्यासाठी महिला दिनाची वाट न बघता प्रत्येक दिवस महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे मत अभिनेत्री मयूरी देशमुख यांनी मांडले. महिला दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री देशमुख हीने ‘देशदूत’शी संवाद साधला.
अभिनेत्री मयूरी देशमुख या मूळच्या धुळ्याच्या. वडिलांची सतत बदली होत असल्याने महाराष्ट्रातील विविध शहरात त्यांचे शिक्षण झाले. नववीत असताना त्यांनी नाटकात भाग घेत पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवले. दरम्यानच्या काळात विज्ञान विषय निवडून तिने शिक्षण केले व पुढे मेडिकलला प्रवेश घेऊन दंत शास्रात पदवी मिळवली.
परंतु कलेची आवड खुणावत असल्याने परफॉर्मिंग आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यामुळे आता अभिनयातच करिअर करायचे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रंगभूमीवर ती कला सादर करत आहे.
आज पडद्यावर काम करत असताना अभिनय हे क्षेत्र निवडल्याचा आनंद होतो. कारण आजही बर्‍याच ठिकाणी महिलांना, स्वतःच क्षेत्रे निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. महिलांमध्ये असणार्‍या कलागुणांना वाव मिळण्यासाठीचे माध्यमे त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी महिलांना व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागू शकतो, असे त्यांनी सांगितले.
महिला दिन जगभर साजरा होतो, परंतु भारतीय संस्कृती मुळात स्त्री सन्मानाची आहे. कारण जन्माला आलेल्या प्रत्येक जण आईच्या उदरातून येत असतो. अशा ह्या अनन्यसाधारण अस्तित्व असलेल्या स्त्रीचा सन्मान अनादीकाळापासून होत आलेला आहे.
महिला दिन खरेतर एक दिवसाचा नसून तो वर्षभर साजरा केला पाहिजे, ज्या माध्यमातून महिला शक्ती व महिलांचा सन्मान सातत्याने घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे हा महिला दिन म्हणजे समस्त महिलांचा गौरव आहे.
आज चित्रपट क्षेत्रात महिला नुसत्या पडद्यावर नसून पडद्यामागे देखील मेहनत घेतात. त्यामध्ये लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कॅमेरा यासारख्या गोष्टी आता महिला सहजतेने हाताळतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीतही महिला आता मागे राहिलेल्या नाहीत.
सेटवर असताना महिला पात्राची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना योग्य वागणूक दिली जाते. मालिकांच्या सेटवर वर्ष दीड वर्षे एखादा ग्रुप काम करीत असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक आपुलकीच तसेच कौटुंबिक नाते एकमेकांमध्ये तयार झालेले असत. आणि हेच नाते समाजातील प्रत्येक घटकामध्ये तयार होणे आवश्यक आहे.
महिलांच्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी आपल्या यंत्रणादेखील कार्यरत आहे, परंतु वेळीच महिलांनी याबाबत आवाज उठविणे आवश्यक आहे. महिलांनी अबला न होता सबला होऊन समोरच्याला योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे. त्यासाठी महिलांनी खंबीर होऊन आपल्याला अडचणींना सामोरे गेले पाहिजे.
मुळात महिला सुरक्षा या विषयाला आयुष्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे. कारण यामुळेच विकृतप्रवृत्तीना महिलांवर अत्याचार करण्यास बळ मिळते. अशा प्रवृत्तीना वेळीच ठेचणे आवश्यक आहे.
आज महिला स्वत:च्या पायावर उभे राहून संसाराचा गाडा हाकत आहेत, स्वबळावर आपला संसार चालवीत आहेत, महिलांचा हा सन्मान एका दिवसापुरता न राहता तो कायम समाजाच्या मनात असला पाहिजे असा निश्‍चय जर प्रत्येकाने केला; तर समाजात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांना निश्‍चित आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*