दरोडेखोरांची टोळी गजाआड

दरोडेखोरांची टोळी गजाआड

नाशिक । प्रतिनिधी

शहरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दिल्ली व सुरत शहरांमधील दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले आहे. दरोडेखोरांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी शहरात दिवसा केलेल्या १० घरफोड्यांची उकल करण्यात यश आले असून त्यांच्याकडून ८ लाख ४६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस नाईक विशाल काठे, पोलीस शिपाई विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, प्रविण चव्हाण हे गस्तीवर असताना त्यांना या टोळीची माहिती मिळाली. अंबड येथील यशवंत मार्केटजवळ संशयितांची टोळी जात असताना पोलिसांना पाहून ते पळाले. त्यामुळे पथकाने पाठलाग करुन पाचपैकी चौघांना अटक केली, तर सलमान शेख हा पसार झाला.

पोलिसांनी रियासतअली आर. मन्सुरी, मोहमंद अरबाज रफिक अहमद शेख, मोहमंद अझर सरफराज शेख (तिघे रा. बिजनोर, उत्तरप्रदेश) आणि सिकंदरखान छोटुखान पठाण (रा. सुरत, गुजरात) यांना अटक करुन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी रिव्हॉल्वर, दोन जीवंत काडतुसे व दरोडा टाकण्यासाठी इतर साहित्य जप्त केले.

त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४, इंदिरानगरच्या हद्दीत ३ व सरकारवाडा, उपनगर आणि गंगापूरच्या हद्दीत प्रत्येकी १-१ घरफोडी केल्याची कबुली दिली. या टोळीने घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने सुरत येथे विक्री केले होेते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस नाइक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, मनोज डोंगरे यांच्या पथकाने सुरतमध्ये जाऊन २१७ ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड व १८० ग्रॅम वजनाची चांदीची लगड जप्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com