Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नर्तनरंग नृत्य संस्था वर्धापनदिन : कथक नृत्याविष्काराची मोहिनी

Share

नाशिक । प्रतिनिधी

कथक नृत्यातील सांगितिक रचनावर आधारित नृत्यरचनेत तोडे, सरगम, झुला, तराणा आदी कथक प्रकारातील थक्क करणार्‍या नृत्य प्रस्तुतीतून नर्तनरंग संस्थेच्या विद्यार्थिनींनी रसिकांवर मोहिनी घातली. निमित्त होते नर्तनरंग नृत्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित ‘नाद वलय’ या कार्यक्रमाचे.

नृत्य अकादमीच्या संचालिका प्रेषिता पंडित यांच्या ‘नर्तनरंग’ या कथक नृत्य संस्थेचा सहावा वर्धापनदिन कालिदास कलामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नृत्यांगणा विद्या हरी देशपांडे यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, दीपक करंजीकर, विद्या देशपांडे, विद्या देशपांडे, प्रेषिता पंडित, विद्यार्थिनी रुद्रा चौधरी व मुक्ता वडाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू… या पंक्तीवर संस्थेच्या विद्यार्थिनींनी कथकचे प्राथमिक ओळख असलेल्या अंगिकम भवनम यस्य, तोडे, पढंत आदी नृत्यप्रस्तुती सादर केली.

त्यानंतर पुष्कराज भागवत यांनी पहिल्यादांच स्वरचित रागावर आधारित तीनताल रागातील सरमग सादर केली. नर्तनरंगच्या वरिष्ठ विद्यार्थिनींनी आज खेलो शामसंग होरी ही देस रागातील पारंपरिक बंदीश सादर केली. यात सुरुवातीला रंगपंचमीची तयारी, झुला, शेवटी ततकार अशी जुगलबंदी रंगली. सामूहिक नृत्यातून पढंत व तालवाद्यावर आधारित या जुगलबंदीला रसिकांनी भरभरुन दाद दिली. मंजिरी असनारे यांच्या स्वरांवर आधारित हंसध्वनी रागातील तराणा सादर करून विद्या देशपांडे यांच्या पढंतवर योग्य असा ताल धरला. सुनील देशपांडे यांच्या स्वरावर आधारित पारंपरिक सरगमनेही कार्यक्रम रंगला. मंजिरी असनारे यांच्या चतरंग स्वरांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

अभिनेते दीपक करंजीकर यांनी देशस्तरावरून सुरू असलेल्या कलाकारांच्या सर्व्हेनुसार नाशिकमधील महान कलाकारांच्या परंपरेला मोठे स्थान असल्याचे सांगितले. संगीत, नृत्य हे आयुष्यातील एका वळणावर आत्मिक समाधान देणारे साधन असल्याने छंद म्हणून प्रत्येकाने जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान विद्या देशपांडे यांनी मुलाखतीदरम्यान प्रेषिता पंडित यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव आणि गुणग्राहकतेचे वैशिष्ट्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश पाठक आणि स्नेहा रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाठक यांनी केले तर आभार प्रेषिता पंडित यांनी मानले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!