Thursday, April 25, 2024
Homeनाशिकधोकादायक वृक्षतोड व पुनर्रोपनास वृक्षप्रेमींचा आक्षेप; सर्वच झाडांचे वृक्षप्रेमींसमवेत सर्व्हे करण्याची मागणी

धोकादायक वृक्षतोड व पुनर्रोपनास वृक्षप्रेमींचा आक्षेप; सर्वच झाडांचे वृक्षप्रेमींसमवेत सर्व्हे करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीकडून शहरातील अपघातास निमंत्रण देणारे धोकादायक, विकास कामात अडथळा ठरणारे, वाळलेले वृक्ष तोडणे, पुनर्रोपण व विस्तार वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात शहरातील वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. याकरिता थेट आयुक्तांना नोटीस पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. समितीकडून मागील बैठकीत निर्णय झालेल्या वृक्षतोड, पुनर्रोपण व छाटणी करण्यापूर्वी वृक्षप्रेमीसमवेत सर्व्हेे करण्यात यावा आणि त्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जावा अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून गेल्या १३ डिसेंबर २०१९ रोजी स्थानिक वृत्तपत्रातून महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीत धोकादायक, वाळलेले व विकासकामास अडथळा ठरत असलेले वृक्ष तोडणे, पुनर्रोपण व छाटणी करण्यासंदर्भात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. यात या कामात कोणाची हरकत असल्यास किंवा कोणाच्या सूचना असल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत हरकती समितीकडे लेखी स्वरुपात दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच प्रकारावर शहरातील नागरिक कृती समितीच्या प्रतिनिधी अश्विनी भट यांच्यासह इतर प्रतिनिधी व वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या या वृक्षतोड, पुनर्रोपण व छाटणीस हरकत घेतली आहे.

याकरिता समिती अध्यक्ष तथा आयुक्तांना वकिलांमार्फत नोटीस पाठविण्याची तयारी केली जात आहे. या वृक्षप्रेमींनी शहरात होत असलेल्या वृक्षतोडीसंंदर्भात खुलासा मागितल्यानंतर तो देण्यात आलेला नाही. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवन परिसरात झालेली झाडाची वृक्षतोड व विस्तार कमी करुन त्याठिकाणी पुनर्लागवड केल्याबाबत आणि या वृक्षांचे जतन व संगोपन केल्यासंदर्भात अहवालाची माहिती आजपर्यंत देण्यात आलेली नाही. तसेच शहरात झाडांच्या बुंध्यावर डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविल्याने झाडाला धोका संभवत असतांना याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे.

शहरात नवीन इमारत किंवा बंगला बांधतांना वृक्षरोपण करणे बंधनकारक असतांना याचे सर्रास उल्लंघन होत असून लावेलेल्या झाडांची पाहणी न करतांच पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. याबाबत कर्मचारी व ठेकेदारावर काही कारवाई केली जात नाही यासंदर्भात खुलासा झालेला नाही. रस्ता विकासाच्या नावाखाली दुतर्फा व मध्यभागी असलेल्या झाडांची कत्तल केली जात आहे. अशाप्रकारे अनेक मुद्दे या नोटिसीत वृक्षप्रेमींनी उपस्थित करीत या महापालिकेच्या कृतीवर नोटिसीद्वारे हरकत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.

अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार
वृक्षप्रेमींनी या हरकतीत प्रामुख्याने समितीने जी काही झाडे तोडण्याचा, पुनर्रोपणाचा व छाटणीचा निर्णय घेतला आहे, त्या सर्व झाडांचा एकत्रित वृक्षप्रेमींबरोबर सर्व्हे करावा, आवश्यक त्या झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करावे अशी मागणी केली आहे. याचा विचार न झाल्यास महापालिकेविरुद्ध कायदेशीर मार्गाने कार्यवाही करावी लागले.
अश्विनी भट, नागरिक कृती समिती नाशिक.

‘त्या’ ९८ झाडांसंदर्भात हरकतीसाठी नोटीस
शहरातील विविध भागात विकासकामांत आणि अपघातांना कारणीभूत ठरणारी, धोकादायक अशा ३४ देशी प्रजातीच्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा आणि ६४ झाडे तोडण्याचा निर्णय ६ डिसेंबर २०१९ रोजीच्या महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. यात नाशिकरोड विभागातील २६ काटेरी बाभूळ व १ सुबाभूळ तोडणे तसेच २९ चंदन वृक्ष पुनर्रोपण करण्यास परवानगी देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (दत्तमंदिर सिग्नल ते द्वारकापावेतो) वड ८ व मोह वृक्ष १ याचे पुनर्रोपन करणे, कडुलिंब ९, शिरस १, करंजी १, आंबट चिंच ३, विलायती चिंच १ असे वृक्ष तोडणे. पोलीस आयुक्तालयामार्फत प्राप्त अहवालानुसार अपघातास कारणीभूत ठरणारी, रस्त्याच्या मधोमध असणार्‍या एकूण १४ वृक्षांचे पुनर्रोपण करणे व ११क्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली. अशाप्रकारे वृक्षतोड, पुनर्रोपण व काही झाडाची छाटणी करण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या