Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअठ्ठावीस लाखाच्या मद्याची परस्पर विक्री; टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अठ्ठावीस लाखाच्या मद्याची परस्पर विक्री; टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नाशिक । प्रतिनिधी

बनावट ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावे बुकींग करून दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारातील मॅकडॉल्स कंपनीचा २८ लाखांचा मद्यसाठा परस्पर विक्री करणार्‍या औरगांबादच्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

किशोर मारूती पडदुणे (२९, रा. बजाजनगर, वाळुंज एमआयडीसी), रवी उर्फ लंडन ड्रिम्स सुरेश शर्मा (२७, रा. बजाजनगर, औरंगाबाद), जगन्नाथ उर्फ बाळू शंकर सोनवणे (२९, रा. पिंपळगाव थोट, ता. भोकरदन, जिल्हा जालना) आणि शेख समद शेख अहमद (३२, रा. भारतनगर, वाळुंज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

या टोळीने बनावट कंपनीच्या नावे २६ सप्टेंबरला दिंडोरीतील मॅकडॉवल्स कंपनीतून २८ लाख रूपयांचा मद्यसाठा ट्रकमध्ये भरला हा मद्यसाठा पुणे येथे सोडण्याऐवजी त्यांनी रस्त्यातच राजगुरूनगर येथे दुसर्‍या ट्रकमध्ये भरून धुळे येथे रफिक शेट नावाच्या व्यक्तीस विक्री केला. हा सौदा १४ लाखांमध्ये ठरला होता. त्यातील १० लाख रूपये टोळीने रोख स्वरूपात घेतले. कंपनीने दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू केला. तपासात या गुन्ह्याचा संबंध थेट औरंगाबाद येथे जोडला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज एमआयडीसी भागात रात्रभर सापळा लावून रवी उर्फ लंडन ड्रिम्स याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या टोळीचा पर्दाफाश झाला.

गुन्हा झाल्यानंतर सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. या सर्वांना पोलिसांनी शोधून अटक केली. पडदुणे हा या कामात सराईत असून, त्याने जळगाव, औरंगाबाद, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, नागपूर आदी एमआयडीसीमधील कंपन्याची याप्रकारे फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात किमान आठ गुन्ह्याची नोंद असून, किमान तीन जिल्ह्यांमधील पोलिस संशयिताचा शोध घेत होते.

पडदुणे मुख्य सुत्रधार
पडदुणे हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. सप्टेंबर महिन्यात पडदुणे आणि त्याचा साथिदार दिंडोरीला आला होता. त्यावेळी त्याने मॅकडॉवल्स कंपनीच्या मालाची वाहतूक कशी होते, याची माहिती घेतली. त्यानुसार त्याने बनावट अरिहंत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाने २६ सप्टेंबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनाची संपर्क साधून मद्यसाठा आपल्या ट्रकमध्ये भरून घेतला व अपहार केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या