Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘सीईटी’साठी पीसीबी, ‘पीसीएम’चे स्वतंत्र पेपर; प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

‘सीईटी’साठी पीसीबी, ‘पीसीएम’चे स्वतंत्र पेपर; प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

येत्या शैक्षणिक वर्षात इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना पीसीएम गटाची सीईटी, तसेच वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास पीसीबी गटाची सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. यासोबतच दोन्ही गटांच्या परीक्षा स्वतंत्रपणे देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये होणार्‍या एमएचटी-सीईटीत विद्यार्थ्यांना ‘पीसीएमबी’ पर्याय नसेल. त्याऐवजी पीसीबी, पीसीएमसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार आहे, असा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या (एआरए) बैठकीत घेण्यात आला आहे.

इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या आधारावर इंजिनिअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, फिशरीज, डेअरी टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. गेल्या वर्षी या परीक्षेच्या निकालासाठी पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब केला होता.

मात्र, विषयांची काठिण्यपातळी आणि निकालाबाबत अनेक पालकांच्या तक्रारी आल्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा इंजिनिअरिंग शाखेसाठी ‘पीसीएम’ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाची सीईटी, तर वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेशासाठी ‘पीसीबी’ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

परीक्षेबाबत महत्त्वाचे-
विद्यार्थ्यांना पीसीएम व पीसीबी अशा स्वतंत्र परीक्षा देता येणार.
दोन्ही परीक्षांचे अर्ज व शुल्क वेगळे भरावे लागणार.
दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असतील
दोन्हीपैकी कोणत्या गटाच्या परीक्षा आधी होतील, याचा निर्णय विद्यार्थीसंख्येनुसार घेण्यात येणार
पीसीएम गटाची परीक्षा : १३ ते १७ एप्रिल या कालावधीत
पीसीबी गटाची परीक्षा : 20 ते 23 एप्रिल
त्याबाबतची माहिती वेबसाइटवर सविस्तर प्रसिद्ध करण्यात येईल.

या नव्या निर्णयामुळे इंजिनिअरिंग करायचे की वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घ्यायचे अशा द्विधा मनस्थितीत असणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, यंदा ‘पीसीएमबी’ गटाची सीईटी नसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या