Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपी.एम.एस प्रणाली संदर्भात ठेकेदारांचा गोंधळ ; प्रणाली तात्काळ बंद करण्याची मागणी

पी.एम.एस प्रणाली संदर्भात ठेकेदारांचा गोंधळ ; प्रणाली तात्काळ बंद करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस) प्रणाली संदर्भात ठेकेदारांना माहिती देण्यासाठी बुधवारी(दि.४)आयोजीत कार्यशाळेमध्ये आक्रमक होत ठेकेदारांनी ही प्रणालीच तात्काळ बंद करा ,अशी मागणी लावून धरली.संतप्त झालेल्या ठेकेदारांनी या प्रणाली वापराबाबतचे दोष सांगत मांडत एकच गोंधळ घातला.त्यातच कार्यशाळेला मुख्य अधिकारी नसल्यामुळे ठेकेदारांनी कार्यशाळेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.अखेर ठेकेदारांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत भुवनेश्वरी एस.यांनी कार्यशाळेमध्ये सहभागी होत मार्गदर्शन केले.

- Advertisement -

पी.एम.एस.अंतर्गत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात ठेकेदार, मक्तेदार व मजुर संस्थांचे अध्यक्ष यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीस कार्यशाळेत ठेकेदारांनी या प्रणाली विरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. सदर प्रणालीमुळे बीले वेळात मिळत नाही, संगणकवार सिस्टीम डाऊन असल्याने वेळात माहिती भरली जात नाही, कर्मचार्‍यांना माहिती भरण्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

१५ दिवसांपूर्वी सदर प्रणाली विरोधात आवाज उठविण्यात आला होता. त्यावेळी भूवनेश्वरी एस यांनी या प्रणालीत १५ दिवसात बदल न झाल्यास मार्च २०२० अखेर ही प्रणाली बंद करण्यात असे सांगितले होते. १५ दिवसात या प्रणालीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे मजूर संस्थेचे उपाध्यक्ष शशीकांत आव्हाड यांनी सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले. प्रशिक्षणात तेच-तेच ट्रेनिंग दिले जात असल्याने कोणतीही सुधारणा होत नाही यासाठी ही प्रणाली बंद करा अशी मागणी आर. टी. शिंदे यांनी केली.

निविदा सेलच्या कामाकाजावर ठेकेदारांनी प्रश्न उपस्थित टेंडर क्लार्क बंद खोलीत बसून निविदा उघडतात यात ठराविक ठेकेदारांना हाताशी घेतात, निविदा उघडण्यात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही ठेकेदारांनी यावेळी केला. निविदा वेळात उघडली जात नसल्याने कार्यारंभ आदेश वेळात मिळत नाही परिणामी काम वेळेत पूर्ण होत नाही. कामे वेळेत झाली नाही की, बांधकाम विभागाकडून दंड आकारला जात असल्याचे अजित यांनी सांगितले. मुदत वाढींना दंड आकारून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अनिल आव्हाड यांनी केला.

या तक्रारी ऐकण्यासाठी भूवनेश्वरी नसल्यामुळे मक्तेदारांनी एकच गोंधळ घातला.मात्र,ठेकेदारांची मागणी लक्षात घेऊन भूवनेश्वरी एस यांना कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले. भुवनेश्वरी एस. यांनी मक्तेदारांच्या विविध अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यशाळेत पी.एम एस अंतर्गत मोजमाप पुस्तिका व रजिस्ट्रेशन याविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीचे जिल्हा नोडल अधिकारी मंगेश खैरनार, ऋषिकेश गरुड, सीडॅक संस्थेचे कुंदन ठाकुर, जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे तज्ञ निलेश चव्हाणके, मयुरी बोराडे व अक्षय चव्हाण यांनी या प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनीही यावेळी मार्गदर्शन करुन या प्रणालीबाबत माहिती दिली. पी.एम.एस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनास सर्वोतपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेस तेजस निरभिवणे, निलेश पाटील, रामदास काळे, अनिल दराडे, सुभाश सानप, विनायक माळेकर, गणेश मालुंजकर, अनिल चौघुले, नागेश कांडेकर, अतुल टर्ले, किरण देशमुख, मोहन भुयटे यांसह कार्यकारी अभियंता खैरनार, संजय नारखेडे, राजेंद्र मोने, डी.एन. गांगुर्डे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या