गणेश मंडळांना घरबसल्या ऑनलाईन परवाना

पोलीस आयुक्तालयाकडून पोर्टल सुरू

0
नाशिक | प्रतिनिधीगणेशोत्सवावर प्लास्टिक बंदीसह, महापालिकेचे मंडप धोरण अशी अनेक संकटांचे सावट असताना पोलीस यंत्रणेने मात्र गणेश मंडळांची नोंदणी व परवाने ऑनलाईन करून दिलासा दिला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.

विशेषत: यंदा गणेश मंडळांना मंडप, स्टेज उभारण्यासाठी महापालिकेने कडक नियमावली लागू केली असतानाच पोलीस प्रशासनाकडून मात्र, आवश्यक असलेला परवाना काढण्यासाठी थेट ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना परवाना काढण्यासाठी पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवण्याची गरज राहणार नाही.

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गेल्या वर्षापासून शहरातील गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेला परवाना ऑनलाइन देण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असल्याने ऑनलाईनबरोबरच पोलीस ठाण्यात अर्ज करून परवाना दिला जात होता. यंदा गणेश मंडळांना वेळेत परवाना घेता यावा तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, या उद्देशाने महिनाभर आधीच ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.

गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना परवाना घेण्यासाठी नाशिक सिटी पोलीस या वेबसाइटवर सिटीझन या पोर्टलवर जाऊन तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले सरकार या संकेतस्थळावर अर्ज केल्यानंतर ध्वनिक्षेपक परवाना तसेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारा परवाना अटी-शर्तीची पूर्तता केल्यानंतर घरबसल्या मिळणार आहे.

त्यामुळे मंडळ पदाधिकार्‍यांची गैरसोय टळणार आहे. मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन पद्धतीनेच पोलीस परवाना घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलीस मंडळांसोबत
उत्सव हा साजरा करण्यासाठीच असतो. परंतु, तो शिस्तीत व इतरांना त्रास होणार नाही, असा असावा हाच आमचा प्रयत्न आहे. गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊन भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही, यासाठी पुरेपूर खबरदारी घ्यावी. सुरक्षित गणेशोत्सवासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आम्ही कायम मंडळांसमवेत आहोत. – रवींंद्र सिंगल, पोलीस आयुक्त

आवश्यक कागदपत्रे
* अग्निशामक दल कार्यालयाचा ना हरकत दाखला
* एमएसईबी कार्यालयाकडील ना हरकत दाखला
* मनपा/खासगी जागा असल्यास जागा मालकाचा ना हरकत दाखला
* मंडप/स्टेज बांधकामासाठी पीडब्ल्यूडीचा ना हरकत दाखला
* भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

LEAVE A REPLY

*