Saturday, April 27, 2024
Homeनाशिकतीन वर्षांत ७२ वन्यजीवांचा मृत्यू; नाशिक पश्चिम वनविभागात सर्वाधिक मृत्यू विहिरीत...

तीन वर्षांत ७२ वन्यजीवांचा मृत्यू; नाशिक पश्चिम वनविभागात सर्वाधिक मृत्यू विहिरीत पडून

नाशिक | प्रशांत निकाळे

नाशिक जिल्हा वन्यजीवांसाठी असुरक्षित ठिकाण बनले आहे. मनुष्य व प्राण्यांच्या एकमेकांसामोरे येण्याच्या घटना वाढत आहेत. दुसरीकडे मनुष्य रहिवासी भाग हा जंगलांकडे अधिकच सरकू लागल्याने वान्यजीवांना वन्यक्षेत्राचा अभाव होत आहे. गेल्या तीन वर्षांत एकट्या नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वनविभागात ७२ वन्यजीवांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वन्यजीवांच्या मृत्यूची नोंद विविध कारणांमुळे झाली आहे. यात विहिरीत पडून, रस्ते अपघात आणि रेल्वे अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. सध्या रस्ते अपघात हे वन्यजीवांसाठी सर्वात जीवघेणे कारण ठरत आहे.

- Advertisement -

वनविभागाची आकडेवारी दर्शवते की, ज्या गोष्टी माणसासाठी विकास ठरत आहेत त्याच उलट वन्यजीवांच्या जिवावर बेतत आहेत. रस्ते अपघाताने गेल्या तीन वर्षांत २० वन्यजीवांचा प्राण घेतला. यात बिबट्या, हायना, वुल्फ आणि कासव यांसारख्या लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे. महामार्ग या वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. वेगवान वाहने स्वत:ला प्राण्यांच्या मृत्यूचे कारण म्हणून सिद्ध करीत आहेत. असे दिसून आले आहे की, आतापर्यंत एकाही वाहनचालकाने वन्यजीव उडवल्यानंतर वनविभागाला त्या प्राण्याच्या मदतीसाठी कळवले नाही अथवा स्वतः थांबून त्या प्राण्याला मदत केली नाही.

वनविभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की, जनजागृती कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात. वनविभाग प्राण्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मुळात लोकांनी वन्यजीवांचे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आपण हे मान्य केले पाहिजे की आपण त्यांच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे. वन्यजीवांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. लोकांनी त्यांचे सहअस्तित्व स्वीकारले पाहिजे. वनविभागाने नुकताच एक नवीन उपक्रम सुरू केला असून वन्यजीव बचावासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना केली आहे. त्यासाठी नुकतीच दोन दिवसांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली आणि सुमारे 40 वन सेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

पूर्वकडे माहितीचा अभाव
नाशिकच्या पूर्व वनविभागाकडे वन्यजीवांच्या मृत्यूविषयी माहिती उपलब्ध नाही. ‘देशदूत’ने सुमारे एक महिना माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पूर्व विभागाने माहिती पुरवली नाही. विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले की, ही माहिती हाताळणारी संबंधित व्यक्ती रजेवर आहे. त्यानंतर असे म्हटले गेले की, जिथे फाईल्स ठेवलेल्या आहेत त्या लॉकरच्या चाव्या उपलब्ध नाहीत. त्यानंतरही विचारणा केलेली माहिती प्रदान करण्यात पूर्व विभाग असक्षम राहिला.

महामार्गांवर फलकांची आवश्यकता
रस्ते अपघात हा वन्यजीवांसाठी सर्वात मोठा धोका आहे. जिल्ह्यात दरवर्षी या घटनांमध्ये वाढ होत आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे कार्य केले पाहिजे आणि वन्यजीव प्रवण क्षेत्र चिन्हांकित केले पाहिजे. त्यांनी महामार्ग व जिल्हा रस्त्यांवरही फलक लावले आहेत, परंतु लोकांचे लक्ष वेधण्यासाठी फलकांचा आकार वाढवलाा पाहिजे.
– अभिजित महाले, वन्यजीवप्रेमी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या