Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकउडीद १२०, मूगडाळ ११० रुपये किलो डाळी कडाडल्या; दर आणखी वाढण्याची चिन्हे

उडीद १२०, मूगडाळ ११० रुपये किलो डाळी कडाडल्या; दर आणखी वाढण्याची चिन्हे

नाशिक । प्रतिनिधी

कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून उडीद १२० तर मूगडाळ ११० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळी आयात केल्या तरच दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या डाळींचे भाव कडाडले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, उडीद आदींच्या किमतींनी प्रतिकिलो शंभरी पार केली आहे.

होलसेल किराणा दुकानात साधारण: ९० ते १२० रुपये किलो दराने डाळींची विक्री होत आहे. अनेक दुकानदारांची भिस्त ही डाळींच्या जुन्या स्टॉकवरच आहे. एकाएकी दर वाढल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजून डाळी खरेदी करावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून काही ग्राहक नेहमीच्या तुलनेत कमी डाळ खरेदी करत आहेत. पुढील काळात डाळींच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होण्याची चिन्हे आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

डाळींचे भाव रुपये
तूरडाळ- ८५ -१००
मूगडाळ- ८५ – ११०
हिरवे मूग- ८५-९०
हरभरा- ६५-७०
उडीद- ११०-१२०

केंद्र सरकार आयात करणार
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे चालू हंगामात डाळींचे नवीन पीक बाजारपेठेत येऊ शकले नाही. केंद्र सरकार इतर देशातून डाळी आयात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयात केल्यावरच डाळींचे चढे दर कमी होतील.

मागील काही दिवसांत डाळींच्या दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत डाळींचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. – कैलास मालपुरे, किराणा दुकानदार

- Advertisment -

ताज्या बातम्या