Friday, April 26, 2024
Homeनाशिकमिनी मंत्रालयातही महाविकास आघाडी पॅटर्न?

मिनी मंत्रालयातही महाविकास आघाडी पॅटर्न?

नाशिक | विजय गिते

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.हीच परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेतही राहणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.तसे पाहता पूर्वापार चालत आलेली शिवसेना-भाजपा युतीला नाशिक जिल्हा परिषदेत बहुमत होते. मात्र,मागील वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत कात्रजचा घाट दाखविला होता.मात्र,सभापती निवडीच्यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत त्याचे उट्टे काढले होते.या दोघांनाही फुटीर काँग्रेसच्या सदस्यांची साथ मिळाल्याने चारही सभापतीपदावर या तीन पक्षांना वर्चस्व स्थापन करता आले होते.आता राज्यात नवीन राजकिय समीकरण उदयास आल्याने शिवसेनेचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होऊ शकतो.मात्र,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच बहुमताचा आकडा पार होणार असल्याने काँग्रेसला सत्तेत वाटा मिळणार की नाही? याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात नवी अघाडी उदयास आली असली तरी नाशिक जिल्हा परिषदेत मात्र यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१७ मध्येच अशा आघाडीतून जिल्हा परिषदेत अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष काँग्रेसचा अपक्षांच्या पाठींब्यावर झालेला आहे.राज्यामध्ये युती असताना त्यावेळी जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा अध्यक्ष तर काँग्रेसचे उपाध्यक्ष पद असे राजकीय गणित जुळवण्यात आले होते.मात्र,याचे उट्टे सत्तेपासून कोसो दूर राहिलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र काढली अन चारही सभापती पदे मिळवली होती.त्यावेळी त्यांना फुटीर काँग्रेसच्या सदस्यांचीही साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले होते.

आता लवकरच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.जानेवारीमध्ये होणार्‍या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणुकीसाठी आता नव्याने जुळून येणारे समीकरण लक्षात घेतले तर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे निश्चित झाले आहे.या महाविकास आघाडीतून अध्यक्षपदही अर्थातच शिवसेनेकडे(सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने) जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्याखालोखाल सदस्य संख्या असून त्यांना उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा मिळूनच बहुमताचा आकडा पार होत असल्याने त्यांना काँग्रेसचीही गरज राहणार नाही.मात्र,राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाआघाडीचा येथेही प्रयोग झाल्यास त्यांना काँग्रेसलाही नाही म्हटले तरी एखादे पद देणे क्रमप्राप्त होणार आहे.

राज्यात झालेली अघाडी म्हणजे तीन चाकाची गाडी अशी टिप्पणी विरोधकांकडून व्यक्त होत आहे.मात्र,अशा परस्परविरोधी विचारांची आघाडी यशस्वी होऊ शकते आणि कार्यकाळ देखील पूर्ण करू शकते,हे नाशिक जिल्हा परिषदेने दाखवून दिले आहे.त्यामुळे आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा फडकवतील,अशी परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची संख्या ७३असून शिवसेनेकडे २५,भाजप १५,राष्ट्रवादी काँग्रेस१९,काँग्रेस ८ आणि अपक्ष तीन असे बलाबल आहे. मात्र,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चार जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणूक लढविल्याने चार जागा रिक्त झाल्या आहेत.त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेकडे २४,भाजपाकडे १५,राष्ट्रवादी काँग्रेस १६,काँग्रेस ८ तर अपक्ष ३ असे बलाबल आहे.त्यामुळे ७३ वरून ही सदस्यसंख्या ६९ वर आली आहे.यामुळे रिक्त झालेल्या चार जागांपैकी तीन जागांवर पोटनिवडणूक होत आहे.अध्यक्ष,उपाध्यक्षपदाची निवडणूक अद्याप शासनाने जाहीर केलेली नाही.त्यामुळे पोट निवडणुकीतुन विजयी होणारे तीनही सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

राज्यातील महाअघाडीचे समीकरण जिल्ह्यातही जुळून आले तर सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेनेकडे २४ सदस्य संख्या असल्याने त्यांचा अध्यक्ष पदावर दावा राहणार आहे.असे झाल्यास राष्ट्रवादीकडे सोळा सदस्य असल्याने उपाध्यक्षपद जाऊ शकते.मात्र,असे समीकरण नव्याने जुळवून घेताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे अध्यक्षपदाचा आग्रह धरल्यास त्यात नवल वाटायला नको.कारण आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही शिलेदारांची भूमिका अध्यक्षपद मिळविण्यासाठी सुरू झाल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या पारंपारीक युतीतील शिवसेनेचा सहकारी असलेल्या भाजपकडे सध्या पंधरा सदस्य संख्या असून त्यांच्याकडून बहुमतासाठी ३७ हा जादुई आकडा जुळविणे अशक्य होणार आहे.फोडाफोडीच्या राजकारणात भाजपच्या हाती काही लागणार का?हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे आहेत इच्छुक
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला तशी सुरुवातही झाली असून अनेक जण अध्यक्षपद,उपाध्यक्ष पदासह सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे,बाळासाहेब क्षीरसागर ,दिपक शिरसाट,सुरेखा दराडे,सुनीता पवार,निलेश केदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय बनकर ,मंदाकिनी बनकर,महेंद्रकुमार काले,किरण थोरे भाजपाच्या मनिषा पवार अशी नावे चर्चेतून पुढे केली जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या