राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज जिल्ह्यात

प्रदेशाध्यक्षांसह नेत्यांच्या उपस्थितीत ६ ठिकाणी सभा

0
नाशिक |प्रतिनिधी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जनतेला निर्धार परिवर्तनाचा अशी हाक देत किल्ले रायगडावरून १० जानेवारीपासून सुरू केलेली निर्धार परिवर्तन यात्रा आज  बुधवारी नाशिक जिल्ह्यात येत आहे.
दोन दिवसांच्या या यात्रेनिमित्त जिल्ह्यात सहा ठिकाणी संपर्क यात्रेच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिवर्तन यात्रेनिमित्त पक्षाच्या केंद्रीय, राज्य नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांत चैतन्य निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्‍न व समस्या घेऊन राज्यातील जनतेपर्यंत निर्धार परिवर्तनाचा हे ब्रीदवाक्य घेऊन परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे आज जिल्ह्यात आगमन होणार आहे.
बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यात यात्रेनिमित्त सहा ठिकाणी संपर्क यात्रा सभा पार पडणार आहेत. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ. अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ.दिलीप वळसे-पाटील, आ. सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, माजी मंत्री फौजिया खान, आ. हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारचा भ्रष्टाचार, अनेक गंभीर चुका, आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यांचे आरोप, खोटी कर्जमाफी, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव, घनकचर्‍याचा प्रश्‍न आणि चार वर्षांत पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ करून केलेली लूट असे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील जनतेपर्यंत निर्धार परिवर्तनाचा हे ब्रीदवाक्य घेऊन परिवर्तन संपर्क यात्रा १० जानेवारीपासून रायगडावरून सुरू केली आहे.
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या निर्धार परिवर्तन यात्रेची पहिली सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या ठिकाणी पार पडली. गेल्या सहा दिवसांपासून जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत असलेली निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा  जिल्ह्यात येणार आहे.
या यात्रेत जिल्ह्यातील आ. नरहरी झिरवळ, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, जयवंत जाधव, दिलीप बनकर, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, ऍड. संदीप गुळवे, विश्‍वास ठाकूर, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ. भारती पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*