‘क्लस्टर’ मुळे होणार झपाट्याने विकास : आ. फरांदे

गावठाण विकासासाठी बैठकीचे आयोजन

0

जुने नाशिक | दि. १२ प्रतिनिधी नाशिक शहराचा सर्वांगीण विकास व स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणजे शहरातील गावठाण भाग असलेल्या जुने नाशिकचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणून जुने नाशिक क्लस्टरच्या माध्यमातून अपेक्षित विकास शक्य आहे. यामुळे घर मालकासह भाडेकरू, दुकानदार अशा सर्व घटकांना लाभ मिळणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनी केले.

जुने नाशिक क्लस्टर व ४ एफएसआय मंजूर झाल्यास शहरातील इतर भागाप्रमाणे जुने नाशिकचा देखील झपाट्याने विकास शक्य होणार आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, नागरिकांनी देखील यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नगरविकास विभागाच्या प्रतिभा भदाणे यांनी देखील दोन्ही मुद्यांवर सविस्तर माहिती दिली. महापौर रंजना भानसी यांनी शहराच्या विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, जुने नाशिकचा देखील विकास होणार आहे. अशी ग्वाही दिली.

जुने नाशिकच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणूक करण्यासाठी जुनी तांबटलेन येथील कालिका मंदिर येथे आ. फरांदे यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेविका शाहीन मिर्झा, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, शंकरराव बर्वे, पुरोहित संघाचे सतीश कुलकर्णी, भाजपा अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष हाजी नामा शेख, फिरोज शेख, इरफान शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

आ. फरांदेंचे कौतुक
मध्य नाशिकचे आ. देवयानी फरांदे यांनी निवडून आल्यापासून कामांचा धडाका लावला आहे. मेळा बसस्थानकाचा विकास विमानतळाप्रमाणे करण्याबरोबर अनेक महत्वाचे प्रकल्प नाशिकला सुरू केले आहे. शंभर खाटांच्या दवाखान्याच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावला, बडी दर्गा येथील संरक्षक भिंत तयार केली, येथील मैदानाचे सुशोभीकरणासाठी भरघोस निधी मंजुर केला, पखालरोड येथे वस्तीगृहाला मंजुरी मिळवली. अशा प्रकारे अनेक कामे त्यांनी केल्याने अनेकांनी त्यांचे यावेळी कौतुक केले.

बोलण्यावरून वाद
आजच्या बैठकीत शेवटच्या सत्रात नागरिकांना प्रश्‍न मांडण्याची संधी देण्यात आली. काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त करीत, काही मुद्दे उपस्थित केले, मात्र याच दरम्यान एका राजकीय कार्यकर्त्याने सूचना न करता इतर गोष्टींवर चर्चा सुरू केल्याने आयोजकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांपैकी काहींनी जोरात आवाज काढ त्याला बोलू द्या, अशी घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याचवेळी माईकदेखील बंद पडल्याने वादात भर पडली. राजकीय वादविवाद या बैठकीत देखील दिसून आले.

तक्रारींचा पाऊस
मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनी बोलावलेल्या बैठकीत जुने नाशिकमधील विविध भागातील नागरिकांनी हजेरी लावली. सुरुवातीला मान्यवरांची भाषणे झाल्यावर शेवटच्या सत्रात नागरिकांना प्रश्‍न मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी तक्रारींचा पाऊसच पडला. नाशिक शहराचा मागील काही वर्षात झपाट्याने विकास झाला, मात्र जुने नाशिककडे कुणी विशेष लक्ष दिलेले नाही. येथील नागरिकांना पाहिजे तसा मान मिळत नाही, लहान मोठ्या बँका जुने नाशिकचा पत्ता राहिला की, उभे करीत नाही. कर्ज मिळत नाही. बँका इतर ठिकाणी घर घेण्यासाठी कर्ज देते, मात्र जुने नाशिकमध्ये जुने घर किंवा वाडा दुरुस्तीसाठीदेखील कर्ज देत नाही.

याबद्दल मान्यवरांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली. येथील रस्ते लहान (छोटे) असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाला मोठा त्रास होतो. अग्निशामकची गाडी आंतमध्ये येत नाही. म्हणून जुने नाशिकसाठी विशेष लहान स्वरुपाची अग्निशामक वाहन तयार करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. याचप्रमाणे अनेक प्रश्‍न उपास्थित करण्यात आले.

मृतांना ५ नको १५ लाख द्या
मागील आठवड्यात तांबटलेन येथील एक जुना वाडा कोसळून दोन तरुणांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने लवकरच ५ लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती आ. फरांदे बैठकीत दिली. दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेले दोन्ही तरुण होते व घरातील कर्ते होते. सध्याच्या महागाईच्या काळात ५ लाखांने काय होणार. तरी शासनाने ५ ऐवजी प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत द्यावी, त्याचप्रमाणे नाशिक मनपाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचा मानधन द्यावा, अशी मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. नागरिकांच्या भावना शासनापर्येंत पोहोचविणार असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*