Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दहा महिन्यांत ४४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सव्वातीन लाख हेक्टरवरील पीक व फळबागा आडव्या झाल्या आहेत. नुकसानीमुळे मालेगाव तालुक्यातील शेतकर्‍याने आत्महत्या केली.. मागील दहा महिन्यांत जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी जीवन संपवले.

दुष्काळ, नापिकी व आता ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. या संकटात शेतकर्‍याला मदतीचा हात म्हणून केंद्र शासनाने कर्जमाफी योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलात आणली. तरीदेखील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.

१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१९ या १० महिन्यांत जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी विष प्राशन करून व गळफास घेऊन आत्महत्या केली. कृषीदृष्ट्या सधन व प्रगत मानल्या जाणार्‍या दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक दहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात नऊ शेतकर्‍यांनी जीवन संपविले. मागील वर्षी जिल्ह्यात १०८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.

आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे कारण, त्याच्या नावे असणारी जमीन, कर्ज आदी बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला तलाठी व तहसीलदार स्तरावरून मिळते. मात्र २२ शेतकरी शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. आजारपण, व्यसनाधिनता, कौटुंबीक कलह यांसारख्या कारणांनी आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२२शेतकर्‍यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या
जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ४४ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. त्यात २२ शेतकर्‍यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे २२ शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

परतीच्या पावसामुळे आत्महत्या
परतीच्या पावसाच्या काळात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या संख्येत वाढ झाली. साधारणत: १५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!