इंदिरानगर खून प्रकरणी दोघांना अटक

नियोजनबद्ध कट करून पैशांसाठीच खून केल्याचे निष्पन्न

0

नाशिक | नाशिक  इंदिरानगर येथील व्यावसायीक खून प्रकरणी अखेर पोलीसांनी फुलेनगर परिसरातील दोघांना अटक केली आहे. तर त्यांचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत. नियोजनबद्ध पध्दतीने कट करून पैशांची लूट करण्यासाठीच हा खून झाल्याचे त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाल्याचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

चिना नाना पवार व सुनिल रामचंद्र पवार (रा. दोघे धारणगाव आवारी ता.अकोला हल्ली कॅनोलरोड फुलेनगर) अशी संशयीतांची नावे आहेत.

इंदिरानगर भागातील सुपर मार्केटचे संचालक अविनाश महादेव शिंदे हे मंगळवारी (दि.८) रात्री आपले दुकान वाढवून चार वर्षाच्या मुलासह घराकडे जात असतांना ही घटना घडली होती.

एकाच इमारतीत दुकान आणि वरती निवास असल्याने शिंदे पितापुत्र दुकान बंद करून पार्किंगमधून आपल्या घराचा जिना चढत असतांना अचानक दबा धरण बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला होता.यावेळी हातातील पैश्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याने शिंदे यांनी प्रतिकार केला होता.

यावेळी संतप्त टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत सहा लाख रूपये असलेली बॅग घेवून पोबारा केला होता. या घटनेत शिंदे यांचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरीलुट आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणासह सर्वच बाजूंनी संयुक्त तपास सुरू होता. युनिट १ चे पथक या घटनेचा तपास करीत असतांना खबर्‍या कडून मिळालेल्या माहितीवरून युनिट १ चे निरीक्षक आनंद वाघ,सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,सचिन खैरनार उपनिरीक्षक पालकर,जमादार पोपट कारवाळ,बाळू दोंदे,हवालदार प्रविण कोकाटे,वसंत पांडव,रविंद्र बागुल,विजय गवांदे,येवाजी महाले,संजय मुळक,अनिल दिघोळे यांच्या पथकाने दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता या घटनेचा उलगडा झाला. अटक केलेले दोघे संशयीत पाईपलाईन खोदकाम करणारे कामगार असून त्यांनी शहरातील तीन सराईत साथीदारांच्या मदतीने कट रचत ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.

संशयीतांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली एमएच १७ बीके २२१० ही सीबीझेड दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, परिसरातील सीसीटिव्हीच्या फुटेज मध्ये दोघे कैद झाले आहेत.

पत्रकार परिषदेत उपायुक्त श्रीकृष्ण कोकाट उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त भागवत सोनवणे आदी उपस्थीत होते.

फरार तीघे सराईत गुन्हेगार
या गुह्यात फरार झालेले तीघेही या गुन्ह्याचे मास्टर माईड असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात जबरीचोरी,आर्म ऍक्ट असे सहाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील एकावर पोलिसांनी तडिपारीचा प्रस्ताव केलेला असल्याची यावेळी देण्यात आली. तसेच तीघांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे अश्‍वान देण्यात आले.

काही दिवसापुर्वीचा प्रयत्न फसला
संशयितांना या भागाची तसेच शिंदे यांची रेकी करून कट रचला होता. यासाठी शेजारी असलेल्या वाईन दुकानाचा अधार घेतला होता. मंगळवारी झालेल्या हत्येच्या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच संशयीतांनी शिंदे यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिंदे यांच्या पत्नी सोबत असल्याने संशयीतांनी माघार घेतल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*