मतांसाठीच दहा टक्के आरक्षण

वंचितांच्या महाअधिवेशनात अ‍ॅड. आंबेडकर यांचा हल्लाबोल

0
नाशिक | प्रतिनिधी  सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचे मोदी सरकारने उचललेले पाऊल हा भाजपचा ‘गेमप्लॅन’ आहे. केवळ मते मागण्यासाठीच १० टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटण्यात आला. मात्र जे आरक्षण कधी मिळणारच नाही ते देण्याची भाषा करणार्‍या सत्ताधारी भाजपला मतदार झोपवल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर  काल (दि.१३) वंचित बहुजन आघाडीच्या वंचितांची सत्ता महाअधिवेशनात अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची धोरणे, जीएसटी, नोटबंदी, राफेल, शेतकरी आत्महत्या, कांदाप्रश्‍न आदी अनेक मुद्यांना स्पर्श केला.
आर्थिक मागास सवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक लाभ मुस्लिम समाजाला झाला असता. निवडणुका आल्या म्हणून केंद्र सरकारने आरक्षणाची घोषणा केली. याला विरोधकांकडून विरोध होईल अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात असे आरक्षण सरकार देऊच शकत नाही. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जनतेची दिशाभूल करणार्‍या सरकारलाच मतदार धडा शिकवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला.
सवर्णांसाठीच्या आरक्षणाला विरोध झाला असता तर भाजपला प्रचारासाठी मुद्दा मिळाला असता. मात्र तेही आरक्षण मंजूर झाल्याने आता त्यांची अवस्था ही ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली आहे. आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांमध्ये मुस्लिमही येतात.
व्यापार, शिक्षण क्षेत्र आणि शासनातील अधिकारी यांची आकडेवारी काढल्यावर या आरक्षणातून सवर्ण बाद होतात. कारण हजार फुटाखाली त्यांचे फ्लॅट नाहीत. आठ लाखांवर उत्पन्न असलेले सर्वच आरक्षणाबाहेर आहेत. या दहा टक्के आरक्षणाचा फायदा मुस्लिमांनाच होईल. हजार चौरस फुटांच्या आत बहुतांश मुस्लिमांची घरे असून आठ लाखांच्या आत उत्पन्न आहे.याचा फायदा मुस्लिमांनाच होणे शक्य होते; पण असे आरक्षण मिळूच शकत नाही. आम्ही निर्बुध्द आहोत, असे सरकारला वाटले असेल, असे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले.
.नोटबंदीचा समाचार घेताना सर्वसामान्यांचा घटनात्मक अधिकार हिरावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. प्रास्ताविक माजी आमदार हरिभाऊ बधे यांनी केले. धनगर समाज हा आता सत्ताकेंद्र झाला असून धनगरांचा बहुजनांच्या मताचा केवळ वापर आतापर्यंत झाला आहे. यापुढे धनगर समाज आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नवनाथ पडळकर,जावेद मुन्शी, किन्नर समाजातर्फे दिशा पिंकी शेख,माजी आमदार बळीराम शिरस्कर,किशोर ढमाले आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर अशोक सोनवणे, इंद्रकुमार भिसे,ऍड. झुंजार आव्हाड, विलास पवार, प्रा.डॉ. शेळके आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे स्वागत भारिप बहुजन महासंघाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा महाअधिवेशनाचे आयोजक पवन पवार यांनी केले.
निवडणुका आल्या की वाजवा टाळी हटवा माळी, वाजवा तुतारी हटवा वंजारी अशी हाक दिली जाते. त्मामुळे आमदार छगन भुजबळ यांनी आपण खरोखरच समतेच्या  वाटेने जाणार असाल तर अ‍ॅड. आंबेडकर यांना साथ देऊन वंचित बहुजन आघाडीत सामील व्हा, असे आवाहन प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

*