Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘…ओ राजरी, घुमर रमवा म्हे जास्या!’; नाशिकच्या सामुदायिक घुमर नृत्याची जागतिक कीर्तिमानाकडे वाटचाल

Share

सातपूर । प्रतिनिधी

ओ म्हाने रमता ने लाडू डो लाद यो ऐ माँ । घुमर रमवा म्हें जास्या, ओ राजरी घुमर रमवा म्हे जास्या, केसरिया, बालमा या सारथ्य राजस्थानी लोकसंगीताचा बाज असलेल्या गीतांच्या थिरकत्या तालावर महिलांचे सामुदायिक घुमर नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरत होते. राजस्थानी गीतांची मधूरता व तालातील गंध या माहोलात बेधुंद करत होता. तरुणींसह वृद्ध महिलांनीही या नृत्यात सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला. जागतिक मानांकन प्रक्रियेच्या दृष्टीने ही वाटचाल असल्याचा प्रत्यय यातून आला. या कीर्तिमानात आपला सहभाग महिलांना जास्त प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र होते. नृत्यासोबतच संघभावनेचा प्रत्यय यावेळी प्राकर्षाने जाणवत होता.

अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने व हेल्थ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने घुमर नृत्य प्रकाराचा आंतरराष्ट्रीय कीर्तिमान स्थापन करण्याच्या दृष्टीने पाच हजार महिलांचे घुमर नृत्य नाशकात झाले. यापूर्वी जोधपूर येथे ३१०० महिलांच्या नृत्याचा कीर्तिमान आहे. तो नाशिकच्या नृत्याने तोडला जाणार आहे. शहर परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यात मारवाडी समाजासोबतच सर्व समाजाच्या महिलांचा सहभाग होता. घुमर नृत्याची पाच हजार महिलांचे एकत्रित नृत्य साकारण्याबद्दलची जागतिक कीर्तिमानाची नोंद करण्यासाठी युनायटेड किंग्डमचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले आहेत

या सामुदायिक घुमर नृत्य महोत्सवाचा शुभारंभ नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे व पश्चिम नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मिसेस इंडिया इंटरनॅशनल अनन्य शिंदे, अभिनेता आर्यन महेश्वरी, सुशील ओझा, नरेंद्र हर्ष, प्रभाव मुंदडा, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपायुक्त संजय विसावे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी गणेशवंदना नृत्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आ. सीमा हिरे व देवयानी फरांदे यांनी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महिलांसोबतच पालक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. नृत्यादरम्यान सहभागी होऊ न शकलेल्या महिलांनी मैदानाबाहेर फेर धरून आपला नृत्याचा आनंद घेतला. तर पालकांची आपल्या प्रियजनांचे व्हिडियो, फोटो काढण्यासाठी लगबग पाहायला मिळाली.

या ठिकाणी विद्युत रोषणाई व बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक विभागाचे अमित बोरा, चेतन भंडारी, तन्मय हिरण, पंकज पिचा, महेंद्र पोद्दार, सुरूची पोद्दार, प्रभा मुंदडा आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील होते. सामाजिक उपक्रमात संघटनचे मोठे काम असून या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, स्वास्थ्य, परस्परांना मदत, सोशल एन्टरप्रिनर्सची निर्मिती करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!