मेगा ब्लॉकनंतर रेल्वेसेवा अंशत: सुरळीत

0
नाशिकरोड |प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकावर फुट ओवर ब्रिजचा गर्डर बसविण्यासाठी विशेष ट्रॉफिक व पावर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दि. ११ ते १३ जानेवारी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. काल अखेरचा दिवस असल्याने रेल्वे वाहतूक अंशत: सुरळीत झाली. परंतु काही रेल्वे गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या तर मुंबईहून नाशिककडे येणारी तपोवन एक्सप्रेस नेहमीच्या वेळेपेक्षा उशीराने धावली.
मेगा ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर काहींच्या वेळापत्रकात व काहींच्या मार्गात बदल करण्यात आले होते. या तीन दिवसांत पहाटे पावणे चार ते सकाळी साडेदहा अशी ब्लॉकची वेळ असल्याने मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली होती. ही गाडी आजपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे.
तसेच एलटीटी-फैजाबाद/राय बरेली एक्सप्रेस, हावडा गीतांजली एक्सप्रेस, गोरखपुर काशी एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला हाता.
गेल्या काही महिन्यापासून मुंबईत सातत्याने मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याने महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द होतात. मेगा ब्लॉक घेण्याचा प्रकार मुंबईत नेहमीच होतो. मात्र इगतपुरी येथेही मेगा ब्लॉक सुरू झाल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे.
महिनाभरापूर्वी इगतपुरीत नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी सुमारे ३० दिवस ब्लॉक घेण्यात आला होता. तेव्हासुद्धा रेल्वेसेवा विस्कळीत होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.
गेल्या तीन दिवसांपासून इगतपुरी येथे फुट ओवर ब्रिजचा गर्डर बसविण्यासाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला. या कालावधीत अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आल्याने प्रवाशांना इतर मार्गाने प्रवास करावा लागला. आता सदरचे काम संपल्याने काल रात्रीनंतर रेल्वेसेवा अंशत: सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

*