Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा विधी प्राधिकरणकडून ग्रामस्थांची जागृती; मोफत विधीसेवेचा लाभ घ्या : न्या कुलकर्णी

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने कायद्याबाबत विविध सेवा सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जातात. या सेवांचा लाभ घेऊन आपल्यावरील अन्याय दूर करता येईल असे प्रतिपादन प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील आंबे बहुला गावात राष्ट्रीय विधीसेवा दिना निमित्त आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना कुलकर्णी बोलत होते.

न्या. कुलकर्णी म्हणाले, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, लहान मुले, अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे नागरिक, औद्योगिक कामगार, तुरुंगातील व्यक्ती, विपत्ती, वांशिक हिंसाचार, जातीय हिंसाचार, नैसर्गिक अपत्ती, दुष्काळ, भूकंप अशा आपत्तींना बळी पडलेल्या व्यक्ती, विकलांग व्यक्ती, मानवी अपव्यापाराचे बळी, भिक्षेकरी या सर्वांना प्राधिकरणाकडून पूर्णपणे मोफत विधी सल्ला व सहाय दिले जाते. खटला लढण्यासाठी पैसे नसतील तर समितीवर नियुक्त वकील उपलब्ध करून दिला जातो.

न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी दाखलपूर्व प्रकरणे समझोत्याने निकाली काढली जातात. नागरिकांना कायदेशीर अधिकार, कर्तव्ये याबाबत साक्षरता जागृती केली जाते. या सर्व मोफत सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा व खटल्याच्या कचाट्यातून सुटका करून घ्यावी असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी आंबे बहुलाचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!