Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ऊस पिकावर तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव; पाने पिवळी अन् लाल ठिबके पडून ऊस जळू लागल्याने शेतकरी हवालदिल

Share

करंजीखुर्द। वार्ताहर

गोदाकाठ परिसरात प्रारंभी पाणीटंचाई त्यानंतर गोदावरी, दारणा नद्यांना आलेला महापूर अन् नुकतीच संपलेली अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अद्यापही अनेक पिके पाण्याखाली आहेत. अशाही परिस्थितीत ज्या शेतकर्‍यांनी ऊस पिक वाचविले त्या पिकांची पाने पिवळी पडून त्यावर लाल ठिबके पडत असून त्यानंतर ही पाने जळतांना दिसत आहे. साहजिक ऊस पिकाची वाढ थांबल्याने हजारो रुपये खर्च करुन उभे केलेले पीक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.

नगदी पिक आणि कमी खर्च, कमी मेहनत म्हणून गोदाकाठचा शेतकरी ऊस पिकाला नेहमीच पसंती देत आला आहे. साधारणत: जुलै ते ऑगस्ट दरम्यान ऊसाची लागवड केली जाते. त्यासाठी एकरी ६ ते ७ हजार रु. प्रमाणे बेणे घ्यावे लागते. शेतीची नांगरणी, सरी पाडणे, वाफे बांधणे व त्यानंतर ऊस लागवड व लागवडीबरोबरच प्रारंभी खताचा पहिला डोस द्यावा लागतो.

साहजिकच प्रारंभीच एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करुन हे पीक उभे करावे लागते. निफाडसह गोदाकाठ भागात खोडवा, आडसाली सुरु ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यावर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाईने हैराण झालेल्या शेतकर्‍यांनी बोअरवेल, पाईपलाईन, विहिर खोदकाम करुन ऊसाचे पिक वाचविले. त्यानंतर गोदावरीला आलेल्या महापुराने संपुर्ण शिवार जलमय झाला.

अति पाण्यामुळे पिके सडली तर आता अतिवृष्टीने उरली सुरली आशा मावळली. त्यातही यातून जे वाचले ते आता साखर कारखान्यांना तोडून देण्याची वेळ तर काही ऊस ऐन बहरात येण्याची वेळ असतांनाच या ऊसाची पाने पिवळी पडून पानांवर लालसर ठिबके पडू लागले असल्याने पानातील सुर्यप्रकाश श्‍वसनप्रक्रिया प्रक्रिया मंदावली आहे.

साहजिकच ऊसाचे वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. हजारो रुपये खर्चुन उभे केलेले ऊस वाया जावू लागल्याने नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी हतबल ठरला आहे. त्यामुळे आता पीक घ्यावे कोणते अन् संकटे झेलावी किती याचे उत्तर शेतकर्‍याला मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती व पिकांवर येणार्‍या विविध रोगांबाबत कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

खोडकिडीनेही केले होते त्रस्त
गेल्या दोन वर्षांपुर्वी ऊस पिकावर खोडकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. ऐन मुळावरच ही किड हल्ला करीत असल्याने उभा ऊस वाळतांना दिसत होता. साहजिकच कधी गारपीट, कधी ज्यादा थंडी तर कधी महापूर, अतिवृष्टी यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. आताही ऊस पिकांना तांबेरा रोगाचा सामना करावा लागत आहे. ऊसाबरोबर द्राक्षबागा, कांदा पिक, मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके देखील वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत आता शासनाकडून पीक नुकसान भरपाईच आशेचा किरण दिसत आहे.
बबन जगताप, शेतकरी तारुखेडले

रासायनिक खतांच्या अतिवापराने किड
वातावरणातील दमटपणा, अति पाऊस आणि युरीया खताचा अतिवापर यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच ऊस पिकामध्ये हवा खेळती रहावी यासाठी दोन सरीमध्ये अंतर जास्त असावे. तसेच खोड, मुळ्या चोकअप होवू नये यासाठी वेळोवेळी ऊस पिकांची अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
राजश्री बागुल, कृषि सहाय्यक निफाड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!