Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आज पवित्र ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त जुलूस; अन्नदान; मशिदींसह घरांमध्ये धार्मिक कार्यक्रम

Share

जुने नाशिक । प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे पैगंबर साहेब यांच्या जयंती अर्थात पवित्र ‘ईद-ए-मिलाद’ सणाची शहरातील मुस्लीम बहुल भागात जय्यत तयारी करण्यात आली असून  दुपारी चौक मंडई येथून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. सकाळी बागवानपुरा चौकात व सायंकाळी बडी दर्गा शरीफ मैदानात सर्वधर्मियांसाठी नियाज (अन्नादान) होणार आहे. मशिदींसह मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष धार्मिक प्रार्थना केली. सर्वत्र भव्य सजावट करण्यात आली आहे.

इस्लामी ‘रबीउल नूर’ महिन्याच्या १२ तारखेला पवित्र ‘ईद-ए-मिलाद’चा मोठा सण मुस्लीम बांधव साजरा करतात. या निमित्त आज  दुपारी ३ वाजता चौक मंडई येथील जहांगीर मशिद समोरुन खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी व उलेमांच्या नेतृत्वाखाली मिलादचे जुलूस (मिरवणूक) निघणार आहे. मुबारक चौक, बागवानपुरा, मरहूम सलीम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, अजेमरी चौक, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवारपेठ, हजरत आदम शाह चौक, काझीपुरा, मुल्तानपुरा, बुरूड गल्ली, कोकणीपुरा, इमाम अहमद रजा चौक, दख्नीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, हुसैनी चौक, पिंजारघाटमार्गे जुलूस बडी दर्गा शरीफला दाखल होणार आहे.

या ठिकाणी सामुदायिकपणे इस्लामी पद्धतीने समारोपची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान सकाळी नौजवाने बागवानपुराच्या वतीने चौकात व सायंकाळी बडी दर्गा शरीफ येथील मंडळाच्या वतीने सर्वधर्मियांसाठी नियाज (अन्नदान) होणार आहे. याची तयारी  करण्यात आली आहे . मिलादच्या पार्श्‍वभुमीवर मागील काही दिवसांपासून मुस्लीम तरुणांच्या वतीने जुने नाशिकसह शालिमार, द्वारका, टाकळीफाटा, विनयनगर, साईनाथनगर, वडाळागांव, भारतनगर आदी भागात सजावटीचे काम सुरू होते. आज त्यांना अंतिम स्वरुप देण्यात आले. गंजमाळ भागात समुद्रात चालणारी भव्य इस्लामी होडीचा देखावा तयार केला आहे. तर चौक मंडईत बडी दर्गा शरीफचा भव्य देखावा तयार करून प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

संपूर्ण मिरवणूक मार्गावर हिरवे, लाल झेंडे, चांदतार्‍यांच्या पताका लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काल  सायंकाळीपासून मशिदींमध्ये तसेच मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बडी दर्गा शरीफ इमारतीत, खडकाळी मशिदीसह इतर मशिदींमध्ये रात्रभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते. काल  आयोध्या प्रकरणाचा निकाल आला तरी शहरातील मुस्लीम बहुल भागात त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. नियमित कामे सुरळीत सुरु होती, तर अधिकतर बांधव मिलादच्या तयारीत मग्न दिसले. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता.

‘डीजे’वर बंदीच
ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्ये भाविकांनी इस्लामी वेशात, वजू करुन सामील व्हावे, सलातोसलाम, नात शरीफ, दरुद शरीफचे पठण करावे, इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, नमाजची वेळ होताच नमाज पठण करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. तर सर्वप्रकारच्या ‘डीजे’वर बंदी घालण्यात आली आहे.

‘मुंह-ए-मुबारक’ चे दर्शन
उद्या पवित्र ईद-ए-मिलाद निमित्ताने बडी दर्गा शरीफसह चौक मंडई येथील जहांगीर मशिदमध्ये पहाटे फजरच्या नमाज पठण झाल्यावर पैगंबर साहेब यांच्या पवित्र केस (मुंह-ए-मुबारक) चे दर्शन भाविकांना घडविण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!