१४ आधारकार्ड सेंटर्स ब्लॅक लिस्टेड

१४ आधारकार्ड सेंटर्स ब्लॅक लिस्टेड

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात काही आधार केंद्रचालक ठाराविक शुल्कापेक्षा जास्त शुल्क ग्राहकांकडून वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी गैरव्यवहारदेखील होत असल्याचे आढळले.या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून आधारकार्डची केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात चौदा आधारकार्ड केंद्रे ब्लॅक लिस्टेड करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९५ आधारकार्ड केंद्रे सुरू आहेत.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, नागरिकत्वाची ओळख यासाठी आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरवा मानला जातो. सरकारी कामांसाठी आधारकार्डची सक्ती केली आहे. त्यामुळे नव्याने आधारकार्ड काढण्यासाठी तसेच ते अपडेट करण्यासाठी आजही आधार केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत.

नाशिक जिल्ह्यात २०११ च्या लोकसंख्येनुसार १०३ टक्के आधारचे काम झाले आहे. परंतु आजच्या लोकसंख्येनुसार हे काम ९८ टक्केच झाले आहे. नवीन नोंदणीपेक्षाही नाव, पत्ता, जन्मतारीख बदल अशी कामे वाढल्याने आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी आहे. याच गर्दीचा आणि गरजेचा फायदा घेत गेल्या वर्षभरात अनेक केंद्रचालकांनी एका कार्डसाठी ग्राहकांकडून १०० ते २०० रुपये घेतले आहेत.

दिंडोरी तहसील कार्यालयातील आधार केंद्रावरील एका ऑपरेटरने तर स्वत:चेच बनावट फिंगरप्रिंट तयार करत थेट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या आधार प्रणालीचीच फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार १७ ऑगस्टला उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मडकीजाम येथील ऑपरेटर कैलास धोंडीराम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

शहरातील सातपूर व पंचवटी विभागातही आधार केंद्रचालकांकडून आधारसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने या केंद्रचालकांची तपासणी मोहीम सुरू केली होती. त्यात तब्बल चौदा केंद्रचालकांच्या कामकाजात अनियमितता आढळून आली होती. त्यामुळे या केंद्रचालकांना ब्लॅक लिस्ट करत त्यांच्याकडून दंडही आकारण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com