Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

परतीच्या पावसाचा डाळिंब, कांद्यास सर्वाधिक फटका शेवगा बागा उद्ध्वस्त

Share

पिंपळगाव दा. । वार्ताहर

परतीच्या संततधार पावसाने मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव, दाभाडी, जळगाव गा. पंचक्रोशीत डाळिब व कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून खरीप पिकांचीही वाताहत झाली आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

पिंपळगाव परिसरात सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्र डाळींब पिकाखाली असून त्यापाठोपाठ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी उशीरा मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाचे चांगले सातत्य राहिल्याने डाळींबांसह कांदा, मका, बाजरी आदी खरीप पिके जोमदार आली होती. मात्र हातातोंडाशी आलेल्या पिकांवर परतीच्या पावसाने पाणी फिरवले असून होत्याचे नव्हते झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे.

सुमारे सहाशे हेक्टर मका, बाजरी, रांगडा कांदा व कांद्याचे उळे पावसाने झोडपून काढले. कापणी केलेल्या बाजरी व मक्याच्या कणसांना अक्षरश: कोंब फुटले तर चाराही भिजून सडल्याने भविष्यात गुरांच्या वैरणीचा प्रश्‍न निर्माण होण्याची चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे. सुमारे दोनशे हेक्टरातील डाळींब बागांचे फुलगळ व रोगांच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज घेत तसेच नातेवाईकांकडून उसनवारी करत पिकांसाठी खर्च केला होता. मात्र पिके हातातोंडाशी आली असतांना निसर्गाने घाला घालत शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. यास्तव महसुल व कृषि विभागातर्फे सरसकट पंचनामे करून संकटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पंचनामे सुरू
परिसरात डाळिंब, कांदा, बाजरी, मका आदी पिकांच्या नुकसानीबरोबरच बेळगावपाडे येथे गारपिट होवून शेवग्याच्या झाडांची फुलगळ होवून शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. सर्वत्र शासकीय मदतीची अपेक्षा केली जात आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पिकांचे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तलाठी पंकज पगार, ग्रामसेवक बी.आर. शिरसाठ, भरत पवार, समाधान पवार आदी पंचनामे करीत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!